Madhya Pradesh Indore hospital News : इंदूरमधील प्रतिष्ठित महाराजा यशवंतराव रुग्णालयातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या रुग्णालयात उंदरांचा इतका सुळसुळाट झाला आहे की उंदरांनी दोन नवजात बाळांचा चावा घेतल्याचं प्रकरण समोर आलं होतं. उंदरांनी चावा घेतलेल्या दोनपैकी एका बाळाचा मृत्यू झाला आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाने म्हटलं आहे की या बाळाचा मृत्यू उंदराने चावा घेतल्यामुळे झालेला नाही.
दरम्यान, या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने दोन नर्सिंग कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. तसेच रुग्णालयातील काही अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. रुग्णालयातील उंदीर नियंत्रणासाठी जबाबदार असलेल्या कीटकनाशक संस्थेवर रुग्णालय प्रशासनाकडून एक लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे.
उपचारांदरम्यान दोन्ही बाळांना उंदरांचा चावा
जन्मजात दोषांमुळे (जन्मापासूनच्या आरोग्यविषयक समस्या) दोन बाळांना नवजात मुलांच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारांदरम्यान उंदरांनी या दोन बाळांच्या बोटांचा चावा घेतला. परिणामी रुग्णालय प्रशासनाने या दोन्ही नवजात बाळांना दुसऱ्या अतिदक्षता विभागात हालवलं.
रुग्णालय प्रशासनाची कठोर कारवाई
वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरविंद घंघोरिया म्हणाले की “रुग्णालय प्रशासनाने याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई केली आहे. अशाप्रकारचा बेजबाबदारपणा रुग्णालयाला परवडणार नाही”, सदर घटनेची माहिती देताना डॉ. घंघोरिया म्हणाले, “सोमवारी डॉक्टरांच्या फेरीदरम्यान दोन्ही बाळं ठीक होती. परंतु, मंगळवारी सकाळी त्यापैकी एका बाळाचा मृत्यू झाला. तर, दुसऱ्या बाळाची प्रकृती नाजूक आहे. या बाळांवरील उपचारांदरम्यान गंभीर चूक झाली आहे आणि आम्ही याप्रकरणी तात्काळ कारवाई केली आहे.”
नवजात मुलीला पालकांनीच रुग्णालयात सोडून दिलं होतं
डॉ. घंगोरिया म्हणाले, “मृत्यू झालेल्या नवजात मुलीचं वजन केवळ १.२ किलो इतकं होतं. तर, जे बाळ वाचलं आहे त्या बाळाचं वजन १.६ किलो इतकं आहे. मृत मुलीच्या कुटुंबाने तिला रुग्णालयात सोडून दिलं होतं. आमच्या रुग्णालयातील कर्मचारी त्या बाळाची काळजी घेत होते.”
रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक यादव यांनी सांगितलं की “उंदराचा चावा हे बाळाच्या मृत्यूचं कारण नव्हतं. जन्मजात हृदयरोगामुळे बाळाचा मृत्यू झाला आहे. ते बाळ अवघ्या तीन दिवसांचं होतं. त्या बाळाचे पालक बळाला रुग्णालयातच सोडून गेले होते. आम्ही पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आहे. तसेच दुसऱ्या बाळाची प्रकृती बरी होत आहे.