Madhya Prdesh Lawyer Became Billionaire: मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातील एका वकिलाबरोबर आश्चर्यजनक असा प्रकार घडला. रातोरात वकिल अब्जाधीश झाला. धार जिल्ह्यातील धामनोड कसब्यात राहणारे नोटरी वकील आणि एका खासगी शाळेचे संचालक विनोद डोंगळे यांच्याबरोबर एक विचित्र घटना घडली. त्यांच्या डिमॅट खात्यात अचानक अब्जावधींची रक्कम दाखवली गेली. डोंगळे यांनी आपल्या डिमॅट खात्यात एवढे प्रचंड पैसे पाहिले, तेव्हा तेही हैराण झाले. मात्र अब्जाधीश झाल्याचा त्यांचा आनंद काही वेळच टिकला.

नेमकं प्रकरण काय आहे?

विनोद डोंगळे यांच्याकडे हर्शिल ॲग्रो लिमिटेड कंपनीचे १,३१२ शेअर्स होते. डोंगळे यांनी जेव्हा आपले डिमॅट अकाऊंट उघडून पाहिले तेव्हा त्यात त्यांना प्रति शेअरची किंमत २ कोटी १४ लाख ७४ हजार झालेली दिसली. या हिशोबाने ते अब्जाधीश झाले होते. त्यांच्या शेअर्सचे एकूण मूल्य २८ अब्ज १७ कोटी ४१ लाख २९ हजार ४०८ रुपये दाखवत होते. एवढी प्रचंड रक्कम पाहून विनोद डोंगळे हैराण झाले.

नंतर काय झालं?

आपल्या डिमॅट अकाऊंटमध्ये अब्जावधी रुपये आहेत, हे पाहून डोंगळे यांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. आपले नशीब आता पालटले, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. मात्र त्यांचा हा आनंद काही क्षणच टिकला. काहीच वेळात हर्शिल ॲग्रोच्या शेअर्सची मूळ किंमत पुन्हा दाखवली गेली.

शेअर्सची अचानक वाढलेली किंमत ही तांत्रिक घोळामुळे झाल्याचे नंतर कळले. ही तांत्रिक गडबड दूर होताच, शेअर्स मूळ किंमतीवर आले आणि डिमॅट खात्यात दाखवली गेलेली २८ अब्ज रुपयांची भलीमोठी रक्कमही गायब झाली.

विनोद डोंगळे काय म्हणाले?

या घटनेनंतर विनोद डोंगळे परिसरात चर्चेचा विषय ठरले. त्यांनी एनडीटीव्हीशी बोलताना हसत हसत सांगितले की, मला आधी वाटले की, माझे नशीबच पालटले आहे. असे वाटत होते की, मी जगातील सर्वात नशीबवान माणूस आहे. मला मोठी लॉटरी लागली. भले काही मिनिटांसाठी का असेना पण मी अब्जाधीश झालो होतो.