Madhya Pradesh : मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये एक डिलिव्हरी बॉय त्याच्या घरातच बनावट नोटा छापत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एवढंच नाही तर तो त्या नोटा बाजारात पसरवत असे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी संशयास्पद डिलिव्हरी बॉयला पकडलं. त्यानंतर चौकशी केली असता हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.

नेमकं प्रकरण काय?

भोपाळ पोलिसांनी एका डिलिव्हरी बॉयला घरात १०० आणि ५० रुपयांच्या बनावट नोटा छापल्याच्या प्रकरणात अटक केली आहे. डिलिव्हरी बॉयच्या घराची झडती घेतली असता बनावट नोटा, छापील पत्रके आणि नोटा छपाईच्या संदर्भातील साहित्य आढळून आले आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

पोलिसांनी २ मे रोजी संध्याकाळी हाऊसिंग बोर्ड चौकात वाहन तपासणी नाका उभारला होता. या कारवाई दरम्यान एक अस्पष्ट नंबर प्लेट असलेल्या एका स्कूटरवरून डिलिव्हरी बॉय उभा असल्याने संशय निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळवला. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतल. त्यानंतर त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली.

तसेच त्याच्या स्कूटरच्या स्टोरेज डब्याची झडती घेण्यात आली असता त्यात १०० रुपयांच्या अनेक बनावट नोटा असल्याचं आढळून आलं. त्याचीही झडती घेतली असता त्याच्या खिशात १०० रुपयांच्या आणखी काही नोटा आढळून आल्या. त्या नोटांवरील क्रमांक एकसारखे असल्याचे आढळून आले. या डिलिव्हरी बॉयने स्वतःची ओळख झाकीर खान (४२) अशी सांगत तो भोपाळमधील इंद्रविहार कॉलनीमधील रहिवासी असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या प्रकरणात आता पोलिसांनी कारवाई करत संबंधित डिलिव्हरी बॉयला अटक केलं आहे. या बरोबरच डिलिव्हरी बॉयच्या घराची झडती घेतल्यानंतर बनावट नोटा छापण्यासाठी वापरला जाणारा प्रिंटर, तसेच ५५ बनावट १०० रुपयांच्या नोटांचा बंडल आढळून आलं आहे. या प्रकणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.