मद्रास उच्च न्यायालयाने मंदिरांच्या उत्सावांचा उपयोग शक्तीप्रदर्शनासाठी करणाऱ्यांना चांगलंच फटकारलं. शुक्रवारी (२२ जुलै) झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सध्या अनेक मंदिरांच्या उत्सवांचा उपयोग वेगवेगळे गटांच्या शक्तीप्रदर्शनासाठी होत असल्याचं निरिक्षण नोंदवलं. तसेच अशा उत्सवांच्या आयोजनांमध्ये कोठेही भक्ती दिसत नाही, असंही नमूद केलं.

न्यायालय म्हणाले, “मंदिरांचा उद्देश भाविकांना शांतता आणि आनंदासाठी देवाची भक्ती करणे हा आहे. मात्र, दुर्दैवाने मंदिर उत्सवात हिंसाचार होत आहे. हे उत्सव त्या भागात कोण अधिक शक्तीशाली आहे हे दाखवण्याचा मंच झाले आहेत. हे उत्सव आयोजन करण्यात कोठेही भक्ती दिसत नाही. यामुळे मंदिर उत्सवांच्या मूळ हेतूचाच पराभव होत आहे.”

“हिंसाचार रोखण्यासाठी अशी मंदिरं बंद करणं योग्य ठरेल”

मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आनंद व्यंकटेश यांच्या खंडपीठाने अशा मंदिर उत्सवांचा शेवट दोन गटांमधील हिंसाचारात होतो, असं निरिक्षण नोंदवलं. तसेच यापेक्षा असे हिंसाचार रोखण्यासाठी अशी मंदिरं बंद करणं योग्य ठरेल, असंही नमूद केलं. कोणत्याही व्यक्तीने आपला अहंकार सोडून आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात गेलं पाहिजे. तसं झालं नाही, तर मंदिरांचा काहीही उपयोग नाही.

नेमकं प्रकरण काय आहे?

एका व्यक्तीने आपण मंदिराचे वंशपरंपरागत विश्वस्त असल्याचा दावा केला आणि दरवर्षी होणाऱ्या मंदिर उत्सवाच्या आयोजनासाठी पोलीस संरक्षणाची मागणी केली. मात्र, राज्य सरकारने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, हा मंदिर उत्सव कुणी करायचा यावरून दोन गटात वाद सुरू आहे. हा वाद सोडवण्यासाठी स्थानिक पातळीवर तहसिलदारांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक झाली. मात्र, त्यात तोडगा निघाला नाही.

हेही वाचा : Manipur Violence : मणिपूरमध्ये महिलांची निर्वस्त्र धिंड; संपूर्ण प्रकरण काय आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“महसूल आणि पोलीस विभागाला दैनंदिन अनेक महत्त्वाची कामं”

दोन्ही गटात मंदिर उत्सवानंतर मूर्ती मंदिरात ठेवण्याचा विधी कुणाच्या हस्ते करायचा यावरून वाद आहे. हा वाद चर्चा आणि बैठकांनंतरही न सुटल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तहसिलदारांनी मूर्ती मंदिरात ठेवण्याचा विधी करण्यापासून दोन्ही गटांना रोखलं. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने महसूल आणि पोलीस विभागाला दैनंदिन अनेक महत्त्वाची कामं करायची असतात. अशा गटांच्या वादात त्यांचा वेळ आणि उर्जा खर्च होत असल्याचं निरिक्षण नोंदवलं. तसेच अशा गटांची अनेकदा देवावर श्रद्धा नसते, त्यांना केवळ आपली शक्ती दाखवायची असते, असंही नमूद केलं.