दिल्लीच्या प्रगती मैदानावर दिमाखात सुरू झालेल्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र पॅव्हेलियनच्या उद्घाटनाचे अथवा या ठिकाणी भेट देण्याचे निमंत्रण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यास महाराष्ट्र लघुउद्योग महामंडळ (एमएसएसआयडीसी) चक्क विसरले. पंतप्रधानांच्या भेटीसाठी दिल्लीत आलेल्या मुख्यमंत्र्यांना ‘तुम्ही व्यापार मेळाव्याला (ट्रेड फेअर) जाणार का,’ असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी ‘मला त्याचे निमंत्रण नाही व त्यासंबंधी कुणी सांगितलेदेखील नाही’, असे स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिले अथवा नाही याची ठोस माहिती देण्याऐवजी महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता असल्याचे कारण सांगितले.
विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात बिहारच्या पॅव्हेलियनचे उद्घाटन बिहारच्या उद्योगमंत्री डॉ. रेणू कुमारी यांनी केले. अर्थात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच पॅव्हेलियनचे उद्घाटन करणे अनिवार्य नसले तरी, या कार्यक्रमाची माहिती मुख्यमंत्री चव्हाण यांना एमएसएसआयडीच्या अधिकाऱ्यांनी राजशिष्टाचाराचा भाग म्हणून देणे अपेक्षित होते. बुधवारी दिवसभर मुख्यमंत्री चव्हाण दिल्लीत होते. तेव्हाही एमएसएसआयडीसीच्या अधिकाऱ्यांना चव्हाण यांची भेट घेता आली असती. कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले अथवा नाही हा प्रतिष्ठेचा विषय नसला तरी राजशिष्टाचार पाळला गेला नाही, हे मात्र मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे अधोरेखित झाले.
 येत्या २७ नोव्हेंबपर्यंत हा मेळावा चालणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयास निमंत्रण मिळाले अथवा नाही यासंबंधी मुख्यमंत्री चव्हाण यांचे जनसंपर्क अधिकारी सतीश लळित यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, यासंबंधी आत्ताच निश्चित काही सांगता येणार नाही. मुख्यमंत्र्यांनीच स्वत: निमंत्रण नसल्याचे सांगितल्यावर लळित म्हणाले की,  आज (शुक्रवारी) मोहरमची सुट्टी असल्याने काहीही खात्रीपूर्वक सांगता येणार नाही.