महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा चर्चेत आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सगळ्या आमदार आणि खासदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्येत पोहचले आहेत. मात्र त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज दुपारी १२ वाजता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत महाआरती करणार आहेत. तर १२.३० वाजता राम मंदिराच्या बांधकामाची पाहणी करणार आहेत. देवेंद्र फडणवीस अचानाक अयोध्या दौऱ्यावर गेल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय म्हटलं आहे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलत असताना आम्ही सगळे या दौऱ्यात सहभागी झालो आहोत त्याच प्रमाणे देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे नेते, मंत्रीही अयोध्येत येतील असंही सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपाचे मंत्रीही असणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवसभर प्रभू रामचंद्रांच्या अयोध्या नगरीत घालवतील. प्रभू रामासाठी उभारण्यात येत असलेल्या भव्य मंदिराचा आढावा ते घेणार आहेत. एकनाथ शिंदे मंदिराचं बांधकाम पाहतील. या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीसही त्यांच्यासोबत असणार आहेत. शिवसेना आणि भाजपाचे मंत्री, शिवसेनेचे खासदार, आमदार यांच्या मुक्कामासाठी मंदिर नगरातील जवळपास सर्व हॉटेल, गेस्ट हाऊस आणि धर्मशाळा बुक करण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे सरकारचे अनेक मंत्री अयोध्येत पोहोचणार आहेत. सीएम शिंदे यांचं विमानतळावर जल्लोषात स्वागत झालं तसंच स्वागत अयोध्येतही होणार आहे. मात्र देवेंद्र फडणवीस या दौऱ्यावर आल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी मुंबईहून लखनऊला विमानाने रवाना झाले. त्यांच्यासोबत भाजपा नेते मोहित कंबोज आणि आमदार संजय कुटेही होते. देवेंद्र फडणवीसही या दौऱ्यात असतील हे तोपर्यंत कुणालाही माहित नव्हतं. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसही भाजपाच्या मंत्र्यांसह येणार असल्याचं सांगितलं ज्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत. शिंदे-फडणवीस यांच्यासह राज्यातील मंत्री, आमदार आणि खासदार अयोध्येतील ज्या पंचशील हॉटेलमध्ये उतरणार आहेत, ते हॉटेल फुलांनी सजवण्यात आलं आहे. हॉटेलबाहेर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे होर्डिंग लागले आहेत. उत्तर प्रदेश सरकारच्या जनसंपर्क विभागाने मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.