Mahatma Gandhi Statue Vandalised before International Day of Non-Violence : लंडनमधील टॅव्हिस्टॉक स्क्वेअर येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. भारताने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. भारतीय उच्चायोगाने म्हटलं आहे की “हा अहिंसेच्या विचारांवरील हिंसक हल्ला आहे.” स्थानिक प्रशासनाने याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी देखील उच्चायोगाने केली आहे. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या टेव्हिस्टॉक स्क्वेअर येथील ध्यानस्थ अवस्थेतील पुतळ्याच्या बाजूला काही आक्षेपार्ह पोस्टर्स लावण्यात आले होते. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या भारतीयांनी संताप व्यक्त केला आहे.

लंडनमधील भारतीयांनी उच्चायोगाला या घटनेची माहिती दिल्यानंतर भारतीय उच्चायोगाने या घटनेचा निषेध नोंदवला आणि स्थानिक अधिकाऱ्यांना पुतळ्याची तोडफोड झाल्याचं सांगितलं. तसेच या स्मारकाची डागडुजी करून नवा पुतळा बसवण्यासाठी समन्वय सुरू केला आहे. भारतीय उच्चायोगाने यासंबंधी समाजमाध्यमांवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “लंडनमधील टॅव्हिस्टॉक स्क्वेअर येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड पाहून भारतीय उच्चायोग खूप दुःखी असून आम्ही या घटनेचा निषेध करतो.”

घटनेचा भारतीय उच्चायोगाकडून तीव्र निषेध

उच्चायोगाने म्हटलं आहे की “ही केवळ तोडफोड नाही. अहिंसेच्या विचारांवर, महात्म्याच्या आदर्शांवर हिंसक हल्ला आहे जो आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाच्या तीन दिवस आधी करण्यात आला आहे. याप्रकरणी ताबडतोब कारवाई व्हावी यासाठी आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांसमोर हा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच याचं गांभीर्य त्यांना समजावून सांगितलं आहे. आमचं एक पथक आधीच घटनास्थळी दाखल झालं आहे. स्मारकाची साफसफाई करण्यात आली असून तिथे नवी मूर्ती बसवण्यासंबंधी पावलं उचलली जात आहेत. यासाठी आम्ही स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आहोत.