scorecardresearch

महात्मा गांधींच्या सांगण्यावरून सावरकरांनी दाखल केली होती दया याचिका : राजनाथ सिंह

स्वातंत्र्य संग्रामातील सावरकरांच्या योगदानाला काही लोकांनी बदनाम केले आणि ते आता सहन केले जाणार नाही, असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

महात्मा गांधींच्या सांगण्यावरून सावरकरांनी दाखल केली होती दया याचिका : राजनाथ सिंह
(फोटो सौजन्य- इंडियन एक्सप्रेस)

हिंदुत्वाचे प्रतीक असणाऱ्या वीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरून अंदमान तुरुंगात कैद असताना ब्रिटीशांकडे दया याचिका दाखल केली होती, पण स्वातंत्र्य संग्रामातील त्यांचे योगदान काही विचारसरणीच्या लोकांनी बदनाम केले आणि ते आता सहन केले जाणार नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन,या उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी राजनाथ सिंह बोलत होते. रूपा पब्लिकेशन्सने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये सावरकरांवरील पुस्तकाचे प्रकाशन करताना सिंह यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनीही मेळाव्याला संबोधित केले. भागवत म्हणाले की, सावरकर कठोरपणे बोलले म्हणून लोकांचा गैरसमज झाला. पण जर संपूर्ण भारत त्यांच्यासारखे बोलला असता तर देशाला फाळणीला सामोरे जावे लागले नसते असा युक्तिवाद मोहन भागवत यांनी यावेळी केला. मोगल सम्राट औरंगजेब सारख्या व्यक्तींच्या नावावर रस्त्यांची नावे ठेवू नयेत या मताशीही ते सहमत होते असेही भागवत म्हणाले.

“सावरकरांच्या विरोधात खूप खोटे बोलले गेले आहे. त्यांनी ब्रिटिश सरकारपुढे अनेक दया याचिका दाखल केल्या हे वारंवार सांगितले गेले. त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी या याचिका दाखल केल्या नाहीत. सामान्यत: कैद्याला दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो. तुम्ही दया याचिका दाखल करा, असे महात्मा गांधी म्हणाले होते. गांधींच्या सूचनेवरूनच त्यांनी दया याचिका दाखल केली. आणि महात्मा गांधींनी सावरकरांना सोडण्याचे आवाहन केले होते. गांधीजी ज्या प्रकारे आम्ही शांततेने स्वातंत्र्याची चळवळ चालवत आहोत, सावरकर तेच करतील असे म्हणाले होते,” असे राजनाथ सिंह म्हणाले.

“सावरकरांनी लोकांना गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठी आणि स्त्रियांच्या हक्कांसह इतर अनेक सामाजिक समस्यांमध्ये अस्पृश्यतेविरोधात आंदोलन करण्यासाठी खरोखर प्रेरित केले. मात्र, देशाच्या सांस्कृतिक एकतेसाठी त्यांचे योगदान दुर्लक्षित केले गेले. २००३ मध्ये सावरकरांचे चित्र संसदेत लावण्यात आले होते तेव्हा बहुतेक राजकीय पक्षांनी त्यावर बहिष्कार टाकला होता, तर सरकार बदलल्यावर अंदमान आणि निकोबार कारागृहात त्यांच्या नावाचा फलक काढून टाकण्यात आला होता,” असेही सिंह म्हणाले.

“तुमच्यात मतभेद असू शकतात, पण त्यांच्याकडे कृतज्ञतेने पाहणे योग्य नाही. त्यांच्या राष्ट्रीय योगदानाला बदनाम करण्याची कृती सहन केली जाणार नाही. सावरकरांची नाझी किंवा फॅसिस्ट म्हणून केलेली टीका देखील योग्य नाही. सत्य हे आहे की त्यांचा हिंदुत्वावर विश्वास होता, पण ते प्रत्यक्षात वास्तववादी होते. त्यांचा विश्वास होता की संस्कृतीची एकरूपता एकतेसाठी महत्त्वाची आहे. सावरकर हे व्यक्ती नव्हते तर एक कल्पना होती आणि त्यांचे अनुयायी दिवसेंदिवस वाढत होते,” असे सिंह यांनी म्हटले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या