आपल्या ज्येष्ठ मुलाच्या वर्तणुकीमुळे चिंतातूर झालेल्या महात्मा गांधी यांनी त्याला लिहिलेल्या पत्रांचा लिलाव पुढील आठवड्यात इंग्लंडमध्ये होतो आहे. या पत्रात महात्मा गांधींनी मुलगा हरिलाल यांच्या वर्तणुकीबद्दल लिहिलेल्या मुद्द्यांमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. हरिलाल यांनी आपल्या आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप महात्मा गांधींनी पत्रातून केला होता. हरिलाल यांची मुलगी मनू हिने या प्रकाराबद्दल सांगितल्यावर गांधींजीनी याबद्दल पत्रातून आपल्या मुलाकडे विचारणा केली होती. त्याचबरोबर देशाच्या स्वातंत्र्यलढ्यापेक्षा मुलाच्या वर्तणुकीमुळे निर्माण झालेले प्रश्न महात्मा गांधींना जास्त तीव्र वाटत असल्याचेही या पत्रांमुळे स्पष्ट झाले आहे.
हरिलाल यांनी आपल्या आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्यामुळे तिला वैद्यकीय उपचार घ्यावे लागले होते. मुलाच्या अशा वागण्यामुळे महात्मा गांधींना तीव्र दुःख झाले होते आणि ते त्यांनी पत्रातून मुलापुढे बोलून दाखविले होते. असे या पत्रातील आशयावरून स्पष्ट होते. एकूण तीन पत्रांचा लिलाव होणार असून ती सर्व गुजराती भाषेत लिहिलेली आहेत. या पत्रांचा लिलाव करणाऱया मुलॉक्स कंपनीने निवेदनाद्वारे याबाबत माहिती दिली.
हरिलाल यांना इंग्लंडमध्ये जाऊन वकिलीचे शिक्षण घ्यायचे होते. मात्र, महात्मा गांधींनी त्याला विरोध केला होता. त्यामुळे १९११ मध्ये हरिलाल यांनी आपल्या कुटुंबीयांसोबतचे सर्व संबंध तोडून टाकले होते. हरिलाल मद्याच्या आहारी गेल्यामुळेही महात्मा गांधींना वाईट वाटले होते, असेही या पत्रातून स्पष्ट होते.