पीटीआय, नवी दिल्ली
उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी गुरुवारी दिल्लीकडे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कूच केली आहे. यामुळे शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नोएडामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. जमावबंदीचा आदेशही लागू करण्यात आला आहे. तसेच दिल्ली-नोएडा सीमा सील करण्यात आल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर क्रेन-बुलडोझर आणि पोलीस वाहने तैनात करण्यात आली आहेत.
उत्तर प्रदेशातील नोएडा आणि ग्रेटर नोएडा येथील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर देशाच्या राजधानीत प्रवेश करणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावल्याने गुरुवारी दिल्ली-नोएडा सीमेवर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा >>>मोदींचं ४०० जागांचं स्वप्न भंगणार? इंडिया आघाडीला किती जागा मिळणार? वाचा ओपिनिअन पोलचे अंदाज काय सांगतात
मयूर विहारजवळील दिल्ली-नोएडा लिंक रोडवर मोठय़ा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे येथे वाहने एकाच जागेवर तासनतास उभी होती. कारण आंदोलक शेतकरी तेथे पोहोचल्यास कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी अवजड क्रेन-बुलडोझर उपकरणांसह पोलीस कर्मचारी सतर्क झाले होते.
कलम १४४ लागू
दिल्ली-नोएडा सीमेवर बुलडोझर, बॅकहो मशीन, दंगल नियंत्रण वाहने आणि पाण्याचे टँकर, ड्रोन कॅमेरे असा लावाजमा होता. या वेळी पोलिसांकडून शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. जेणेकरून ते आपले आंदोलन थांबवतील. गौतम बुद्ध नगर पोलिसांनी नोएडा व ग्रेटर नोएडात कलम १४४ (जमावबंदी) लागू केले आहे. त्याचबरोबर सर्व सीमा २४ तासांसाठी सील करण्यात आल्या आहेत.