मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी पुन्हा एकदा भारतविरोधी सूर आळवला आहे. चीनवरून परतल्यानंतर मुइज्जू म्हणाले, भारताने १५ मार्चआधी मालदीवमधून आपलं सैनिक हटवावं. याआधी मुइज्जू यांनी म्हटलं होतं, कोणीही आम्हाला धमकावण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न करू नये. गेल्या अनेक वर्षांपासून भारताची एक मोठी सैन्यतुकडी मालदीवमध्ये तैनात आहे. मालदीवमधील आधीच्या सरकारने केलेल्या विनंतीनंतर भारताने मालदीवमध्ये एक सैन्यतुकडी तैनात केली होती. तेथील सागरी सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीतल्या बचाव कार्यासाठी भारतीय लष्कराने एक सैन्यतुकडी मालदीवला पाठवली होती. परंतु, नव्या सरकारने भारताला आपलं सैन्य परत बोलावण्यास सांगितलं आहे.

भारतीय सैन्याबाबत मालदीवच्या अध्यक्षांच्या कार्यालयाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एक निवेदन जारी करण्यात आलं होतं. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, आम्हाला आशा आहे, भारत आमच्या लोकांच्या लोकशाही इच्छेचा आदर करेल.

मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी शनिवारी (१३ जानेवारी) चीनवरून मायदेशी परतल्यानंतर अप्रत्यक्षपणे भारताला इशारा देण्याचा प्रयत्न केला. मुइज्जू म्हणाले, भले आम्ही लहान देश असू शकतो, असं असलं म्हणून कोणालाही आम्हाला धमकावण्याचा किंवा दाबण्याचा परवाना मिळालेला नाही. मुइज्जू यांनी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं. परंतु, त्यांचा रोख हा भारताकडे होता, असं म्हटलं जात आहे.

हे ही वाचा >> मालदीवच्या बाबतीत ‘वयम् पंचाधिकम् शतम्…’ असे आहेच, पण तरीही…

मुइज्जू यांची चीनकडे मालदीवला पर्यटक पाठवण्याची विनंती

गेल्या आठवड्यात मालदीवच्या तीन उपमंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आणि भारतीय नागरिकांबद्दल केलेल्या अपमानास्पद, तसेच वर्णद्वेषी टिप्पण्यांनंतर मालदीवची पर्यटन कोंडी करण्याचे सूर भारतातून उमटू लागले आहेत. मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांमध्ये भारतीय पर्यटकांचं प्रमाण सर्वाधिक आहे. परंतु, मालदीवच्या मंत्र्यांनी भारताविरोधात गरळ ओकल्यामुळे भारतीय पर्यटक आणि पर्यटन कंपन्यांनी त्यांच्या मालदीववाऱ्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे आता मालदीवच्या पर्यटनाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अशातच मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी आपला मोर्चा चीनकडे वळवला. मालदीवचे अध्यक्ष नुकताच पाच दिवसांचा चीन दौरा करून मायदेशी परतले आहेत. या चीन दौऱ्यात त्यांनी चिनी सरकारला मालदीवमध्ये पर्यटक पाठवण्याची विनंती केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुइज्जू हे चीनधार्जिणे आहेत ही गोष्ट एव्हाना भारतीय उपखंडातील लोकांपासून लपून रहिलेली नाही. मुइज्जू यांनी नुकतीच चीनवारी केली. यावेळी त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. एकीकडे भारताबरोबरचे संबंध ताणले गेले असताना मुइज्जू यांनी चीनचा दौरा केल्याने अनेकांन्या भुवया उंचावल्या होत्या.