Mallikarjun Kharge on US tariff : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील मैत्रीवर देखील विधान केले आहे. तसेच मोदी हे ट्रम्प यांचे मित्र
कलबुर्गी येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना राज्यसभेतील विरोधी पक्षाचे नेते खरगे म्हणाले की मोदी आणि ट्रम्प हे एकमेकांशी चांगले वागू शकतात, कारण त्यांनी एकमेकांसाठी मते मागितली होती. पण मोदी-ट्रम्प यांच्या युतीची भारताला किंमत मोजावी लागत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
“मोदी आणि ट्रम्प मित्र असू शकतात. मात्र मोदी देशासाठी शत्रू बनले आहेत. इतका टॅरिफ लादला आहे. ५० टक्के टॅरिफ लावून कोणाला उद्ध्वस्त केलं? आपल्या लोकांना उद्वस्त केलं…. मोदी आणि ट्रम्प यांच्यासाठी ते दोघे चांगले आहेत. कारण त्यांनी एकमेकांसाठी मते मागितले आणि जगात असा कोणताही पक्ष नाही जी जाऊन दुसऱ्या देशातील उमेदवाराला पाठिंबा देते. हे चुकीचे आहे.”
तुम्ही तुमच्या विचारांवर चाला. देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवा. कारण देश पहिला आहे, त्यानंतर तुमची मैत्री असेल. त्यामुळे आमचे मत आहे की, मोदी जे करत आहेत ते चूक आहे. आपल्याला जेव्हा अडचण आली तेव्हा आमचं सांगण आहे की, मोदींनी किमान आता तरी सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचा घडा घ्यावा, आणि मोदींना हे लक्षात घेण्याची गरज आहे की भारताचे परराष्ट्र धोरण दशकांपासून तटस्थतेवर आधारित आहे आणि ते त्याच मार्गावर चालू राहिले पाहिजे, असेही खरगे म्हणाले.
काही दिवसांपूर्वी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना ट्रम्प म्हणाले होते की, “मी नेहमीच पंतप्रधान मोदींचा मित्र राहीन. ते एक महान पंतप्रधान आहेत. पण सध्या मला त्यांची काही धोरणे आवडत नाहीत. भारत आणि अमेरिकेचे संबंध खूप खास असले तरी काळजी करण्यासारखे काही नाही. कधीकधी असे क्षण येतात.”
यावर पंतप्रधान मोदी यांनी प्रतिक्रिया दिली होती, मोदी म्हणाले होते की, “भारत-अमेरिका संबंधाबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी जी सकारात्मकता दाखवली आणि त्यांच्या भावना व्यक्त केल्या, त्याबद्दल आभार. आम्ही त्यांच्या भावनांशी सहमत आहोत. जागतिक धोरणात्मक भागीदारी आणि भविष्याकडे पाहण्याचा व्यापक दृष्टीकोन यामध्ये भारत आणि अमेरिका खूप सकारात्मक आहे.”