३० नोव्हेंबरपर्यंत गरीबांना धान्य मोफत दिलं जाणार आहे अशी अत्यंत महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. याचा लाभ देशातल्या ८० कोटी जनतेला होणार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजनाही लवकरच लागू केली जाणार आहे अशीही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जनतेशी संवाद साधताना केली. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जून २०२१ पर्यंत रेशन दुकानावर मोफत अन्नधान्य देण्याची घोषणा केली आहे.

देशातील १३० कोटी जनतेला केंद्र सरकारच्या योजनेतून धान्य मिळायला हवं, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. लॉकडाउनचा फटका बसलेल्या मजूर व कामगारांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरु केली होती. या योजनेची मुदत ३० जूनरोजी संपणार होती. अनलॉक २ ची घोषणा करता केंद्र सरकारने नोव्हेंबरपर्यंत ही योजना वाढवली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत देशभरातील ८० कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार असल्याचं मोदींनी सांगितलं.

काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला अन्न सुरक्षा योजनेचा कालावधी वाढवण्याची मागणी केली होती. सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहीत सप्टेंबरपर्यंत योजना वाढवण्याची विनंती केली होती. अखेरीस केंद्राने निर्णय घेतल्यानंतर पश्चिम बंगाल सरकारने आपल्या राज्यातील जनतेसाठी वर्षभरासाठी मोफत अन्नधान्य पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.