Javed Akhtar Event: बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या एका कार्यक्रमाला पश्चिम बंगालमधील इस्लामिक संघटनांनी विरोध केल्यामुळे हा कार्यक्रम आता पुढे ढकलण्यात आला आहे. ममता सरकार इस्लामवाद्यांसमोर झुकल्याचा आरोप आता विरोधकांनी केला आहे. राज्य सरकारद्वारे संचलित पश्चिम बंगाल उर्दू अकादमीतर्फे ‘हिंदी सिनेमातील उर्दू’ हा कार्यक्रम ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान कोलकातामध्ये होणार होता. मात्र मुस्लीम संघटना ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ने आक्षेप घेतल्यामुळे या सांस्कृतिक कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली आहे.
जावेद अख्तर सैतान
पश्चिम बंगाल उर्दू अकादमीने अपरिहार्य परिस्थिती उद्भवल्याचे कारण पुढे करत ही घोषणा केली. मात्र जावेद अख्तर यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्यानंतर जमियत उलेमा-ए-हिंदच्या कोलकाता युनिटने यावर आक्षेप घेतला होता, अशी माहिती समोर येत आहे. कोलकाता युनिटचे सरचिटणीस झिलूर रहमान यांनी सांगितले, “जावेद अख्तर यांनी इस्लाम, मुस्लीम आणि अल्लाहविरुद्ध खूप वाईट गोष्टी बोललेल्या आहेत. ही व्यक्ती मानवी वेषातली सैतान आहे. त्यामुळे या कार्यक्रमात जावेद अख्तर यांना बोलावू नका.”
झिलूर रहमान यांनी अकादमीला लिहिलेल्या पत्रात वरील उल्लेख केलेला आहे. ते पुढे म्हणाले, उर्दू जगात अनेक चांगले कवी, लेखक आणि पत्रकार आहेत. त्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाऊ शकते.
शबनम हाश्मी यांच्याकडून पाठिंबा
दरम्यान नाटककार आणि कार्यकर्ते दिवंगत सफदर हाश्मी यांच्या भगिनी शबनम हाश्मी यांनी जावेद अख्तर यांना पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात म्हटले की, ही तर सुरुवात आहे. मी याबद्दल आधीच इशारा दिला होता. मुस्लिमांमधील उजव्या विचारसरणीच्या संघटनांना वैध ठरविणे बंद करावे, असे पूर्वीपासूनच सांगत आले आहे.
शबनम हाश्मी यांनी पुढे म्हटले की, मुस्लिमांमधील उजव्या विचारसरणीच्या संघटनांबरोबर एकाच व्यासपीठावर येण्यास नकार दिल्यानंतर दिल्लीतील नागरी समाजाने मला पद्धतशीरपणे बाजूला सारले होते. तसेच त्यांनी जावेद अख्तर यांना टॅग करत कोलकातामध्ये येण्याचे आवाहन केले. “तुम्ही येण्यास तयार असाल तर मी कोलकातामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यासाठी तयार आहे”, असेही त्या म्हणाल्या.