तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल रॉय भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांनी स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. एवढेच नाही तर मुकुल रॉय सोमवारी रात्री दिल्लीलाही गेले होते. या राजकीय उलथापालथीमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं एक मोठं वक्तव्य समोर आलं आहे.

‘मुकुल रॉय हे भाजपाचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यावा, हे पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे. पण त्यांचा मुलगा सुभ्रांशु याने मुकुल रॉय बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे,” अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी ‘एएनआय’ला दिली. “मी कधीही टीएमसीबरोबर नव्हतो. मी भाजपाबरोबर काम करत राहीन, असं मुकुल रॉय म्हणाले होते.

मुकुल रॉय प्रकरणावर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजपा सत्तेत आहे, त्यामुळे त्यांना वाट्टेल ते, ते करत आहेत.. पण सत्ता ही तात्पुरती असते हे त्यांना समजत नाही. खुर्ची येते आणि जाते, पण लोकशाही कायम राहील. संविधान कायम राहील, त्यात काही दुरुस्त्या होऊ शकतात, पण या संविधानावर बुलडोझर चालवता येणार नाही. २०२४ च्या निवडणुकीत भाजपा जिंकणार नाही.

मुकुल रॉय यांचा दिल्ली दौरा

मुकुल रॉय हे सोमवारी रात्री दिल्लीत गेले. वैयक्तिक कामामुळे आपण दिल्लीला गेलो, असं त्यांनी म्हटलं. सुरुवातीला त्यांच्या कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाल्याचा दावा केला होता. त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचंही कुटुंबीयांनी सांगितलं होतं. यावर ममता बॅनर्जी म्हणाल्या, “आजारी असलेल्या टीएमसी नेत्याचा वापर करून भाजपाने गलिच्छ राजकारण करू नये.”

हेही वाचा- “…तर मी राजीनामा देईन”, अमित शाह यांचं नाव घेत ममता बॅनर्जींचा भाजपावर हल्लाबोल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, मंगळवारी मुकुल रॉय यांनी एका बंगाली वृत्तवाहिनीला सांगितलं की, मी भाजपाचा आमदार आहे. मला भाजपाबरोबर राहायचं आहे. मला अमित शाहांना भेटायचं आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी बोलायचं आहे. तृणमूल काँग्रेसचे संस्थापक सदस्य असलेले मुकुल रॉय २०१७ मध्ये भाजपामध्ये सामील झाले होते. 2021 मध्ये त्यांनी भाजपाचे उमेदवार म्हणून पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. मात्र, त्यानंतर लगेचच ते विधानसभेचा राजीनामा न देता तृणमूल काँग्रेसमध्ये परतले होते.