Mamta Kulkarni On Dhirendra Shastri and Ramdev Baba : बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या खूप चर्चेत आहे. अलीकडेच ती महाकुंभ मेळ्यात दिसली होती. यावेळी ममता कुलकर्णीने महाकुंभ मेळ्यात आयोजित एका कार्यक्रमाद्वारे संन्यास घेतला. तिला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पद देण्यात आले होते. यावर अनेक आखाड्यांमधील महंतांनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर शुक्रवारी (३१ जानेवारी) किन्नर आखाडा व महामंडलेश्वर पदावरून तिची हकालपट्टी करण्यात आली. किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णीवर कारवाई केली. ममताला महामंडलेश्वर करण्यास माझा आधीपासूनच विरोध होता, असंही दास यांनी सांगितलं. तसेच दास यांनी ममता कुलकर्णीबरोबरच तिला महामंडलेश्वर करणाऱ्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची देखील आखाड्यातून हकालपट्टी केली आहे. दरम्यान, ममताला महामंडलेश्वर केल्यानंतर त्यास विरोध करणाऱ्यांमध्ये बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री व योग गुरू रामदेव बाबा यांचा देखील समावेश होता. मात्र, आता ममताने या दोघांच्याही विरोधावर प्रतिक्रिया दिली आहे.

ममता कुलकर्णीने इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखीत बागेश्वर बाबा व रामदेव बाबा या दोघांच्याही टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. रामदेव यांच्या वक्तव्यावर ममता म्हणाली, “बाबा रामदेव यांना मी काय उत्तर देऊ? त्यांनी महाकाल व महाकालीचं भय बाळगायला हवं. ईश्वरच त्यांच्याबद्दल निर्णय घेईल”.

ममता कुलकर्णीचा बागेश्वर बाबाच्या वक्तव्यावर पलटवार

तर, धीरेंद्र शास्त्री यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना ममता कुलकर्णी म्हणाली, “तो नॅपी धीरेंद्र शास्त्री आहे. जेवढं त्याचं वय आहे तितकी वर्षे मी तपश्चर्या केली आहे. त्या शास्त्रीला इतकंच सांगेन की त्याने त्याच्या गुरुपाल विचारावं की मी कोण आहे? २३ वर्षांच्या तपश्चर्येदरम्यान, दोन वेळा मी त्याच्या गुरूबरोबर राहिले आहे. त्यांचे गुरू रामभद्राचार्य यांच्याकडे दिव्य दृष्टी आहे. त्यांना विचारावं की मी कोण आहे आणि उत्तर मिळाल्यावर स्वस्थ बसावं”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ममता कुलकर्णी हिला विचारण्यात आलं की तू महामंडलेश्वर का झलीस? त्यावर ती म्हणाले, “मला महामंडलेश्वर व्हायचं नव्हतं. मात्र, किन्नर आखाड्याच्या आचार्य लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी मला महामंडलेश्वर होण्यास भाग पाडलं. मी महामंडलेश्वर होण्यास कधीच तयार नव्हते”. ममता कुलकर्णीने महामंडलेश्वर होण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप होत आहे. यावर ती म्हणाली, माझ्याकडे एकही पैसा नाही. माझी सर्व बँक खांती गोठवण्यात आली आहेत. मी दोन लाख रुपये उधार घेऊन गुरूंना भेट म्हणून दिले आहेत.