man arrested for forcing dalit man to taste spilled water to prove it is not urine in up lucknow Crime News : एका वृद्ध दलित व्यक्तीला मूत्र नसल्याचे सिद्ध करण्यासाठी मंदिरात सांडलेले पाणी चाखण्यास भाग पाडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये मंगळवारी एका ६२ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने जातिवाचक वक्तव्य आणि धमक्या दिल्याचाही आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना काकोरी येथील मंदिरात सोमवारी घडली.

काकोरी पोलीस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफिसर सतीश चंद्र यांनी सांगितले की, ६० वर्षीय पीडित रामपाल यांच्या तक्रारीनुसार, ते मंदिराच्या आवारात बसले असताना त्यांच्या जवळील पाण्याची बाटली नकळत सांडली होती.

नेमकं काय झालं?

एसएचओ पुढे म्हणाले की, पीडित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार आरोपी स्वामी कांत याला कथितपणे वाटले की त्यांनी (रामपाल) तेथे मूत्र विसर्जन केले आहे आणि त्यानंतर त्याने शिवीगाळ करण्यास आणि धमकावण्यास सुरुवात केली. जेव्हा पीडित व्यक्तीने विरोध केला आणि आरोप फेटाळला तेव्हा कांत याने ते पाणी शुद्ध असल्याचे सिद्ध करण्यासाठी कथितपणे त्यांना सांडलेल्या पाण्याला बोटाने स्पर्श करण्यास आणि ते बोट जि‍भेवर ठेवण्यास भाग पाडले. पीडित व्यक्तीने त्याने सांगितल्याप्रमाणे केले आणि ते घरी परतले.

दुसऱ्या दिवशी रामपाल त्यांच्या नातेवाईकांना बरोबर घेऊन पोलीस ठाण्यात पोहचले आणि त्यांनी कांत याच्या विरोधात अधिकृत तक्रार दाखल केली.

यानंतर, काकोरी पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध आरोपांखाली एफआयआर नोंदवला. याशिवाय, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याचे कलम देखील लावले आहेत. “आम्ही या प्रकरणी आरोपी स्वामी कांतला अटक केली आहे,” अशी माहिती एसएचओ चंद्र यांनी दिली. कांत हा मागासवर्गीय समाजातील आहेत.

पोलिसांनी सांगितले की ही घटना घडली त्या मंदिराच्या जवळच तो राहतो, ज्यामुळे त्याला परिसराची चांगली माहिती आहे. रामपाल हे देखील दररोज दुपारी मंदिराच्या वरांड्यात बसत असत. दरम्यान पोलिसांनी सांगितले की, चौकशीवेळी आरोपीने रामपाल यांना फक्त पाण्याला स्पर्श करण्यास सांगितल्याचा दावा केला.