स्वत:च्या कुत्र्याचे आधार कार्ड बनविणाऱ्या एका महाभागाला मंगळवारी मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात पोलीसांकडून अटक करण्यात आली. येथील उमरी शहरात आधार नोंदणी कार्यालयात निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या आझम खानच्या या प्रतापामुळे अनेकजण चक्रावले आहेत. आझम खानने बनवून घेतलेल्या या आधार कार्डावर त्याच्या कुत्र्याचे नाव, त्याच्या वडिलांचे नाव , जन्म तारीख आणि लिंग अशी सर्व माहिती नमूद करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी उमरी पोलीस ठाण्यात येथील आधार नोंदणी कार्यालयात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. याशिवाय, संबंधित आधार कार्यालयातून पाळीव प्राण्यांचे आधार कार्ड दिले जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत केलेल्या कारवाईत आझम खानला अटक करण्यात आल्याची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याचे अधीक्षक नवनीत भसीन यांनी दिली. दरम्यान, पोलीसांकडून आझम खानवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने अशाप्रकारची अजून आधार कार्डस बनविली आहेत का, याची चौकशी सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man arrested for getting aadhar card made for dog
First published on: 03-07-2015 at 05:00 IST