Crime News : बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील एक ३५ वर्षीय व्यक्तीला गुरूवारी संध्याकाळी अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हॉट्सअॅपवरून धमकी दिल्या प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या बिहार दौरा सुरू असताना ही धमकी देण्यात आली होती. दरम्यान ही धमकी दिल्याच्या काही तासांतच स्थानिक पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या समन्वयाने या व्यक्तीला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान कार्यालयाला व्हॉट्सअॅप कॉल करत पंतप्रधान मोदी यांनी बिहार दौऱ्यावेळी इजा पोहचण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) आणि गृह मंत्रालय अशा केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ याची दखल घेतली होती

भागलपूरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) हृदय कांत यांनी शुक्रवारी सांगितले की, केंद्रीय यंत्रणांनी भागलपूर पोलीसांना याबद्दल सूचित केले. यानंतर उपपोलिस अधीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) चंद्र भूषण यांच्या नेतृत्वाखालील सुलतानगंज पोलीस ठाण्याचे टेक्निकल सेलच्या अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने तत्काळ तपास सुरू केला.

तांत्रिक विश्वेषणातून असे आढळून आले की हा क्रमांक व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) वापरून ७१ वेळा सक्रिय करण्यात आला होता. पथकाने हा क्रमांक सुलतानगंज येथील रहिवासी मंटू चौधरी नावाच्या ७१ वर्षीय व्यक्तीच्या नावावर असल्याचे शोधून काढले, असे पोलिसांनी सांगितले.

एसएसपी कांत यांनी म्हणाले की, चौकशीदरम्यान चौधरी याने तो साधा किपॅड असलेला फोन वापरत असल्याचे सांगितले आणि या प्रकरणात कोणताही सहभाग नाकारला तसेच पुतण्या समीर कुमार रंजन याच्याकडून आपल्याला फसवले जात असल्याचा आरोपही केला.

त्यानंतर चौकशीदरम्यान, समीर रंजन याने गुन्हा कबूल केला आणि त्यानंतर त्याला अधिकृतरित्या अटक देखील करण्यात आली. आरोपीने स्वत:ची ओळख लपवण्यासाठी व्हीपीएनचा वापर केला होता आणि व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमातून धमकी दिली होती, असे कांत यांनी सांगितले.

धमकी देण्यामागील नेमकं कारण काय?

एसएसपींनी असेही सांगितले की, प्राथमिक तपासादरम्यान पोलिसांना आढळून आले की, आरोपीचा त्याच्या काकाबरोबर जमिनीवरून वाद सुरू आहे आणि त्याने मंटू चौधरी याला अडकवण्याच्या उद्देशानेच ही धमकी दिली होती. दरम्यान धमकी देण्यासाठी वापरण्यात आलेला फोन पोलिसांनी जप्त केला आहे आणि पुढील तपास केला जात आहे. तसेच चौधरी याला सोडून दिले आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरूवारापासून दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत, शुक्रवारी ते रोहतास येथे भेट देणार आहेत.