Man shoots dead 25 dogs in Rajasthan : गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा मुद्दा देशभरात चर्चेत आला आहे. या दरम्यान राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यात २ आणि ३ ऑगस्ट रोजी एका व्यक्तीने २५ हून अधिक कुत्र्यांना गोळ्या घालून ठार केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीचे नाव शेओचंद बावरिया असे असून तो डुमरा येथील रहिवासी आहे. हा आरोपी उघडपणे बंदुक घेऊन कुत्र्यांना गोळ्या घालत फिरतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

व्हिडीओमध्ये दोघेजण दुचाकीवरून पाठलाग करून कुत्र्यांना रायफलने गोळ्या घालताना पाहायला मिळत आहेत, यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले कुत्र्यांचे मृतदेह संपूर्ण गावातील रस्त्यांवर आणि शेतात पडल्याचे दिसत आहेत. यामुळे गावकरी आणि प्राणी प्रेमींमध्ये एकच संतापाची लाट उसळली आहे. घाबरून जीव वाचवून धावणाऱ्या कुत्र्यांना क्रूरपणे ठार करण्यात आल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

वेगळ्या दुचाकीवरून जाणाऱ्या एका तिसऱ्या व्यक्तीने कुत्र्यांना गोळ्या घालणाऱ्या दोघांचा मागून व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. दरम्यान प्रशासकीय अधिकारी अजूनही या व्यक्तीचा गुन्ह्यात सहभाग होता की नाही याबद्दल माहिती घेत आहेत.

पोलीस अधीक्षक ब्रिजेश ज्योती उपाध्याय यांनी सांगितले की, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ४ ऑगस्ट रोजी तपास सुरू करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत बावरिया याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. तसेच या प्रकरणात इतर स्थानिकांचा सहभाग आहे की याचा देखील पोलीस तपास करत आहेत.

“कुमावस गावात एका व्यक्ती कुत्र्यांवर गोळीबार करत असल्याच्या व्हिडीओबद्दल आम्हाला माहिती आहे. प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात आली आहेत,” असे उपाध्याय यांनी सांगितले.

प्राणीप्रेमी आणि ग्रामस्थांनी या क्रूर हत्यांचा निषेध केला आहे, तसेच आरोपीविरोधात कठोर करावाईची मागणी केली आहे. दरम्यान पोलीसांनी आरोपींना तात्काळ अटक केली जाईल असे आश्वासन दिले आहे. तर काही लोकांनी या घटनेबद्दल केंद्र सरकार आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना देखील या घटनेबद्दल माहिती दिली आहे.