Hand Grenade Incident: आपल्या वाईट कामांची तात्काळ परतफेड याअर्थी इन्स्टंट कर्मा अशी एक संकल्पना इंग्रजीत ओळखली जाते. आपल्या आसपास अशा अनेक घटना घडल्याचे पाहण्यात येते. ‘जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो, त्याच खड्ड्यात तोही एकेदिवशी पडतो’, अशी मराठीत एक म्हण आहे. या म्हणींना सार्थ ठरविणारी घटना थायलंडमध्ये घडली आहे. प्रेयसीने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर संतापलेल्या प्रियकराने तिच्या घरावर हँड ग्रेनेड फेकला होता. मात्र या हल्ल्यात प्रियकरालाच स्वतःचे प्राण गमवावे लागले आहे. तर प्रेयसी सुखरूप बचावली.
बँकॉक पोस्टने दिलेल्या बातमीनुसार, २५ रोजी ग्रेनेड हल्ल्यात ३५ वर्षीय प्रियकर ठार झाला. तर इतर चार जण गंभीर जखमी झाले. थायलंडच्या था चाना जिल्ह्यात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नेमके प्रकरण काय आहे?
प्रेयसीने संबंध तोडल्यानंतर चिडलेला प्रियकर प्रेयसीच्या घराजवळ गेला आणि तिला चर्चेसाठी बाहेर बोलवले. ती पुन्हा संबंध ठेवण्यास होकार देईल, अशी त्याला अपेक्षा होती. मात्र प्रेयसीने पुन्हा प्रेमसंबंध ठेवण्यास सपशेल नकार दिला. प्रेयसीचे मन वळविण्यात अपयश आल्यानंतर संतापलेल्या प्रियकराने तिच्यावर कात्रीने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्त्यावर रहदारी असल्यामुळे त्याला लोकांनी अडवले.
यानंतर आणखी चिडलेला प्रियकर त्याच्या गाडीकडे गेला आणि गाडीतून हँडग्रेनेड काढला. हँडग्रेनेडची पिन काढून त्याने प्रेयसी आणि त्याला अडविणाऱ्या लोकांच्या दिशेने फेकला. पण रस्त्यात असलेल्या एका खांबाला लागून हँडग्रेनेड मध्येच पडला. हँडग्रेनेड उचलून पुन्हा फेकण्यासाठी प्रियकर पुढे सरसावला त्याने ग्रेनेड हातात घेतला आणि तेवढ्यात स्फोट झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट इतका भीषण होता की, तिथे उभ्या असलेल्या गाडीच्या काचा फुटल्या. हल्लेखोर प्रियकर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तर प्रेयसीने वेळीच तिच्या घरात धूम ठोकल्यामुळे ती बचावली होती. रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांपैकी चारजण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.