हरियाणातील फरिदाबाद येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका सोसायटीत गरबा कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादातून एका ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सोसायटीतील दोन तरुणांनी पीडित व्यक्तीच्या मुलीची छेड काढली होती. यानंतर पीडित व्यक्तीने संबंधित तरुणांना जाब विचारला असता वाद वाढला. बाचाबाचीदरम्यान, आरोपी तरुणांनी ५२ वर्षीय व्यक्तीला धक्काबुक्की केल्याने ते बेशुद्धावस्थेत जमिनीवर कोसळले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित घटना फरिदाबादच्या सेक्टर ८६ मधील प्रिन्सेस पार्क सोसायटीमध्ये सोमवारी रात्री घडली. यावेळी पीडित व्यक्ती आपल्या कुटुंबीयांसह गरबा कार्यक्रमात सहभागी झाली होती. दरम्यान, सोसायटीतील दोन तरुणांनी पीडित व्यक्तीच्या मुलीकडे जाऊन तिचा संपर्क क्रमांक मागितला. तसेच दांडिया कार्यक्रमादरम्यान त्यांनी मुलीच्या हाताला अयोग्यरित्या स्पर्शही केला, असा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

हेही वाचा- ढोलीडा ढोल बाजे…! अमृता फडणवीसांनाही आवरला नाही गरबा खेळण्याचा मोह; Video मुळे पुन्हा आल्या चर्चेत 

घडलेल्या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना समजताच दोन्ही बाजूंमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाची दरम्यान पीडित मुलीच्या वडिलांना धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी ते बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडले. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. रुग्णालयात जाताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं.

हेही वाचा-गरबा खेळताना २४ तासांत १० जणांचा मृत्यू, चिंताजनक कारण आलं समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वादाचा एक व्हिडीओही समोर आला आहे. ज्यामध्ये गरबा कार्यक्रमादरम्यान दोन गट कॉलर पकडून एकमेकांना ढकलताना दिसत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.