पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात सरदार वल्लभभाई पटेल आणि भारताच्या एकतेचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी अयोध्या प्रकरणावरही भाष्य केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. केवळ भारतात नाही, तर आता जगभरात दिवाळी साजरी केली जाते, असेही ते म्हणाले. देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना पंतप्रधानांनी दिवाळीचा प्रकाश सर्वदूर पसरवत शत्रुत्वाची भावना समाप्त करून टाका असा बंधुभाव आणि प्रेमाचा संदेश दिला.

भारतातील नागरिक देशाच्या ऐकतेसाठी नेहमी प्रयत्नशील असतात. देशाची एकता आणि अखंडतेसाठी भारतीय समाजातील लोक नेहमी प्रयत्नशील आणि सतर्क असतात. ही एकता आणि अखंडता २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयावेळी पहायाला मिळाली. त्यावेळी राम मंदिराच्या निर्णयावेळी काही समाजकंटकांनी स्वत:च्या हितासाठी दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काहींनी मोठमोठ्याने घोषणाबाजी करुन उपस्थितांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण न्यायालयाचा निर्णयानंतर सारं काही विसरुन प्रत्येकाने देशात झालेला सकारात्मक बदल पाहिला. त्यावेळी देशांमध्ये आनंदाचे वातावरण होते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.