एका माणसावर त्याच्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे. सदर महिलेचा मृतदेह एका मैदानातल्या ड्रममध्ये तिच्या हत्येनंतर दोन महिन्यांनी सापडला आहे. ही घटना तामिळनाडूतील चेन्नईतल्या तिरुवल्लूर भागातील आहे. पोलिसांनी २२ ऑक्टोबरला ही माहिती दिली. या प्रकरणात पोलिसांनी सिलमबरासन नावाच्या ३३ वर्षीय माणसाला अटक केली आहे. त्याने गुन्हा कबुल केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
नेमकी घटना काय घडली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिलमबरासनने त्याच्या पत्नीला ठार केलं आणि त्यानंतर तिचा मृतदेह एका ड्रममध्ये भरला आमि तो ड्रम तिरुवल्लुर जिल्ह्यात असलेल्या एका मैदानात पुरला. पीटीआयने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिलमबरासनने १४ ऑगस्टला त्याच्या पत्नीचा मृतदेह ड्रममध्ये भरला आणि तो ड्रम पुरला. ज्या ठिकाणी तो ड्रम पुरला होता ते ठिकाण या दोघांच्या घरापासून तीन किमी अंतरावर आहे. पोलीस अधीक्षक विवेकानंद शुक्ला यांनी ही माहिती दिली. पोलिसांना तो मृतदेह सापडला आणि त्यानंतर या प्रकरणाचा छडा लावण्यात आला असंही पोलिसांनी सांगितलं.
पतीला पत्नीची अफेअर्स असल्याचा संशय
पोलीस अधीक्षक शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार सिलमबरासनला त्याच्या पत्नीचे म्हणजेच प्रियाचं अनेकांसह प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. त्यातून त्यांचे खटके उडू लागले होते. त्या भांडणांचा अंत प्रियाच्या हत्येमध्ये झाला. प्रियाचे वडील श्रीनिवासन यांनी प्रिया बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलीस या प्रकरणात प्रियाचा शोध घेत होते. मी माझ्या मुलीशी संपर्क साधू शकत नाहीये तिचं काहीतरी बरं वाईट झालं असावं असा संशय मला आहे असं श्रीनिवासन यांनी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी त्यानंतर प्रियाचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. बेपत्ता होण्यापूर्वी प्रिया तिच्या माहेरी गेली होती. तिने मला नवऱ्यापासून घटस्फोट हवा आहे कारण तो सातत्याने माझ्यावर संशय घेतो असं आई वडिलांना सांगितलं होतं. तिच्याकडून सगळं ऐकल्यानंतर तिचे आई वडीलही तिला म्हणाले होते की तू घटस्फोट घे आणि विभक्त हो. पण त्यानंतर ती बेपत्ता झाली आणि दोन महिन्यांनी तिचा मृतदेह सापडला.
सिलमबरासन सुरुवातीपासूनच पोलिसांची दिशाभूल करत होता त्यामुळे संशय वाढला
सिलमबरासनची चौकशी केली तेव्हा त्याने प्रियाबाबत वेगवेगळी माहिती दिली. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरचा संशय वाढाला. पोलिसांनी मग आपला खाक्या दाखवून त्याला प्रश्न विचारले तेव्हा त्याने गुन्हा कबूल केला अशी माहिती शुक्ला यांनी दिली आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे. यानंतर सिलमबरासनविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला १५ दिवसांच्या पोलीस कोठडीत धाडलं आहे. तसंच प्रियाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तो अहवाल आल्यानंतर याबाबत आणखी उलगडा होऊ शकेल असंही शुक्ला यांनी सांगितलं.