दिल्लीत एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने ७० हजार रुपयांत स्वत:साठी पत्नी खरेदी केली. पण, नंतर पत्नी न सांगता सासरी जात असल्याने व्यक्ती संतापला. याच रागातून व्यक्तीने महिलेचा खून करत मृतदेह जंगलात फेकून दिला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली आहे.
डीसीपी चंदन चौधरी यांनी सांगितलं, दिल्लीतील फतेहपूर बेरी परिसरामधील जंगलात एका महिलेचा मृतदेह असल्याचा फोन शनिवारी आला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला आहे.
यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी परिसरात आलेल्या गाड्यांची माहिती घेतली. तेव्हा शनिवारी रात्री १.४० वाजण्याच्या सुमारात परिसरात एक रिक्षा आल्याची माहिती मिळाली. रिक्षाच्या नंबरवरून मालकाचा शोध घेण्यात आला. त्यावेळी दिल्लीतील छतरपूरमधील गदईपूर बांध रोड परिसरात राहणाऱ्या अरुण याची ही रिक्षा असल्याचं समोर आलं. पोलिसांनी अरुणला ताब्यात घेत चौकशी केली. तेव्हा धक्कादायक खुलासे समोर आले.
अरुणने पोलीस तपासात सांगितलं की, “मृत महिलेचं नाव स्विटी आणि पतीचं नाव धरमवीर आहे. धरमवीर, सत्यवान आणि मी स्विटीचा खून केला. दिल्ली-हरियाणा सीमेजवळ असलेल्या नांगलोई परिसरात स्विटीचा गळा दाबून तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला.” जंगलाच्या परिसराची पहिल्यापासून माहिती असल्याने मृतदेह तिथे फेकल्याचं अरुणने म्हटलं.
हेही वाचा : मंदिरातून घरी जाणाऱ्या महिलेबरोबर घडला अनर्थ, कारमध्ये बसवून जंगलात नेलं अन्…
खूनाचे कारण सांगत अरुण म्हणाला, “धरमवीर पत्नीच्या वर्तवणुकीवरून नाराज असायचा. स्विटी सतत न सांगता महिनो-महिने आपल्या सासरी जायची. धरमवीरने स्विटीला ७० हजार रुपयांत विकत घेतलं होतं. त्यामुळे स्विटीच्या कुटुंबाबद्दल माहिती नव्हती. स्विटीही तिच्या कुटुंबाबाबत बोलत नसे. फक्त ती बिहारची रहिवाशी असल्याचं सांगितलं होतं.”
हेही वाचा : माणुसकीला काळीमा: दरोडेखोरांनी हात-पाय बांधल्याने मुंबईत ७० वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी अंत
पोलिसांनी आरोपींविरोधात खूनासह पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. खूनात वापरण्यात आलेली रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पण, स्विटी महिनो-महिने कुठं जायची? असा प्रश्न उपस्थित होत आहे.