Kulgam Custodial Killing: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांना अन्न आणि निवारा पुरविल्याप्रकरणी २३ वर्षीय इम्तियाज अहमद मागरे या तरूणास सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले होते. मात्र सुरक्षा दलापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्याने नदीत उडी मारली. उडी मारल्यानंतर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे इम्तियाज मागरे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेल्याचे स्पष्ट दिसत आहे.
शनिवारी जम्मू-काश्मीर पोलिसांनी मागरेला ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, तो कुलगाम जिल्ह्याच्या तंगमार्ग येथील जगंलात लपलेल्या अतिरेक्यांना अन्न आणि इतर रसद पुरवत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सुरक्षा दलांना अतिरेकी लपलेल्या ठिकाणी नेण्याचे मान्य केले होते. पण घटनास्थळी गेल्यानंतर त्याने नदीत उडी घेतली.
सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मागरेचा ओढ्यात मतृदेह आढळला. यानंतर मागरेचे कुटुंबिय आणि नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. इम्तियाज मागरे याचा कोठडीत मृत्यू झाला असावा, असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे.
राज्याच्या आरोग्य आणि शिक्षण मंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्या सकिना इटू यांनी रविवारी मागरेच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांनी या मृत्यूचा तपास व्हावा अशी मागणी केली. सकिना इटू म्हणाल्या, “राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हे दुर्दैवी आहे. मी नायब राज्यपालांना विनंती करते की, त्यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी. इम्तियाज अहमाद यांना त्यांच्या घरातून नेण्यात आले आणि आज त्यांचा मृतदेह सापडला.”
मागरेच्या मृत्यूमुळे वाद
पीडीपी पक्षाच्या अध्यक्षा मेहमूबबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे लोकसभा सदस्य आगा रुहुल्लाह मेहदी आणि जम्मू आणि काश्मीरचे मंत्री सकिन इट्टूय यांनी या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली.