गेल्या पाच महिन्यांपासून मणिपूरमध्ये असलेली आर्थिक नाकेबंदी आज मध्यरात्रीपासून संपुष्टात असणार आहे. गेल्या पाच महिन्यांपासून युनाइटेड नागा काऊंसिलने लादलेली आर्थिक नाकेबंदी आज मध्यरात्रीपासून संपणार आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नागा समूहांच्या चर्चेनंतर ही नाकेबंदी आज उठवण्यात येणार आहे.

युनायटेड नागा काउंसिलच्या नेत्यांना विनाशर्त तुरुंगातून मुक्त केले जाणार आहे. त्याच बरोबर नाकेबंदीच्या काळात कार्यकर्त्यांवर नोंदवण्यात आलेले सर्व गुन्हे रद्द करण्यात येतील असे प्रसिद्धिपत्रकामध्ये म्हटले आहे. सेनापती जिल्ह्यात ही बैठक झाली त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

राज्याचे माजी मुख्यमंत्री इबोबी सिंह यांनी सात नव्या जिल्ह्यांच्यानिर्मितीची घोषणा केली होती. त्याविरोधात नोव्हेंबर २०१६ पासून आर्थिक नाकेबंदी करण्यात आली. केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे सत्येंद्र गर्ग, अतिरिक्त मुख्य सचिव सुरेश बाबू, मणिपूर सरकारतर्फे राधाकुमार सिंह आणि युएनसी महासचिव एस. मिलन यांच्यातर्फे संयुक्त प्रसिद्धिपत्रक जारी करण्यात आले आहे.

आर्थिक नाकेबंदीवरुन मणिपूरमध्ये राजकारणही झाले. मणिपूरमध्ये भारतीय जनतेचे सरकार आल्यास आम्ही राज्यातील आर्थिक नाकेबंदी संपुष्टात आणू असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. त्यांनी हे आश्वासन दिल्यानंतर काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री इबोबी सिंह यांनी मोंदीवर टीका केली होती. पंतप्रधानांनी असे विधान केल्यामुळे आपल्याला धक्का बसला आहे असे ते म्हणाले. पंतप्रधान या मुद्दाचे राजकारण करतील असे आपणास वाटले नव्हते असे इबोबी म्हणाले. भाजपचे सरकार आले नाही तरी आर्थिक नाकेबंदी संपुष्टात आणण्यास त्यांनी सहकार्य करावयास हवे असे इबोबी यांनी म्हटले होते. आर्थिक बंदी संपुष्टात आल्यानंतर मणिपूर मधील दळण-वळण आणि आर्थिक व्यवहार आता सुरळित होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.