Manipur Violence : मैतई आणि कुकी समुदायातील वादामुळे मणिपुरात हिंसाचार उफाळला आहे. गेल्या दोन महिन्यापासून मणिपूर धुमसतं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सराकरकडून मणिपूरच्या नागरिकांना शांततेचं आवाहन करण्यात आले आहे. तसंच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शांतता समितीचीही स्थापना केली आहे. मात्र, याकडे पाठ फिरवत मणिपुरात हिंसाचार सुरूच असल्याचं स्पष्ट झालं आहे. गुरुवारी रात्री, केंद्रीय मंत्री आर.के. रंजन यांचे इम्फाळमधील कोंगबा येथील निवास्थान जमावाने जाळण्याचा प्रयत्न केला आहे.

जवळपास १००० लोकांच्य जमावाने केंद्रीय मंत्री आर.के. रंजन यांच्या घरी कडेकोट सुरक्षा असातनाही धाड टाकली. यावेळी मंत्र्यांच्या निवासस्थानी नऊ सुरक्षा एस्कॉर्ट कर्मचारी, पाच सुरक्षा रक्षक आणि आठ अतिरिक्त रक्षक तैनात होते. रंजन यांच्या घरातील एका सुरक्षा कर्मचाऱ्याने सांगितले की, हल्ल्यादरम्यान जमावाने चारही दिशांनी पेट्रोल बॉम्ब फेकले.

हेही वाचा >> लवकरच भारतातून बँकॉकला बायरोड जाता येणार; महामार्गाचं काम ४ वर्षांत पूर्ण होणार!

“आम्ही घटना रोखू शकलो नाही कारण जमाव प्रचंड होता. त्यामुळे परिस्थितीही नियंत्रणात ठेवू शकलो नाही. इमारतीच्या मागे असलेल्या बाय लेनमधून आणि समोरच्या प्रवेशद्वारातून त्यांनी चारही दिशांनी पेट्रोल बॉम्ब फेकले”, अशी माहिती एस्कॉर्ट कमांडर एल दिनेश्वर सिंग यांनी दिली.

“मी सध्या कामासाठी केरळमध्ये आहे. सुदैवाने, काल रात्री माझ्या इंफाळच्या घरी कोणीही जखमी झाले नाही. हल्लेखोर पेट्रोल बॉम्ब घेऊन आल्याने माझ्या घराच्या तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर नुकसान झाले आहे,” अशी माहिती केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री रंजन यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली.

मणिपूरमध्ये ३ मेपासून अनुसूचित जमाती (एसटी) वर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीवरून मैतई आणि कुकी या दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष होत आहेत. या संघर्षात आतापर्यंत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय मंत्र्यांनी मणिपूरच्या जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले. “माझ्या मूळ राज्यात जे घडत आहे ते पाहून खूप वाईट वाटते. मी अजूनही शांततेचे आवाहन करत राहीन. जे लोक या प्रकारच्या हिंसाचारात सहभागी आहेत ते पूर्णपणे अमानवीय आहेत”, असंही आर. के. रंजन म्हणाले.