कानपूरमधील व्यावसायिकाचा गोरखपूरमधील एका हॉटेलमध्ये पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. यानंतर देशभरात हे प्रकरण चर्चेचा विषय ठरलं. विशेष म्हणजे मृत मनिष गुप्ता यांनी ४ महिन्यांपूर्वीच भाजपात प्रवेश केला होता, अशी माहिती त्यांच्या भावाने दिलीय. मनिष कानपूर भाजपच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्येही सहभागी व्हायचे, असंही त्यांनी नमूद केलंय. यानंतर आता उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर टीकेची झोड आणखी वाढलीय.

मनिष गुप्ता कोण आहे?

मनिष गुप्ता यांनी एमबीएचं शिक्षण घेतलं होतं. त्यांनी व्यावसायात उतरण्याआधी एका खासगी बँकेचे मॅनेजर म्हणूनही काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी प्रॉपर्टी डिलिंगचं काम सुरू केलं, अशी माहिती मनिष गुप्ता यांच्या भावाने इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना दिलीय. मनिष गुप्ता यांच्या पश्चात पत्नी आणि ४ वर्षांचा मुलगा आहे. मनिष यांचं ५ वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं आणि ते नोएडात स्थलांतरीत झाले. मात्र, लॉकडाऊनमध्ये ते पुन्हा कानपूरला परतले होते.

नेमकं प्रकरण काय?

मनिष गुप्ता आपल्या दोन मित्रांसह गोरखपूरला गेले. तेथे ते एका हॉटेलमध्ये थांबले. मात्र, रात्रीच्या वेळी ५ ते ६ पोलिसांनी हॉटेलवर रेड मारली. यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी मनिष गुप्ता यांना जबर मारहाण करुन हत्या केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी त्यांचे मित्र आणि त्यांच्या पत्नीने केलाय. गुप्ता यांच्या पत्नीने ही हत्या लपवण्यासाठी हॉटेल कर्मचाऱ्यांनी रुममधील रक्ताचे डाग धुवून काढल्याचाही आरोप केलाय.

शवविच्छेदन अहवालात मारहाणीने मृत्यू झाल्याचं स्पष्ट

पोलिसांनी मात्र मनिष गुप्ता हे नशेत पडल्याचं आणि डोक्याला मार लागल्याचा दावा केलाय. मात्र, शवविच्छेदन अहवालात पोलिसांच्या मारहाणीचा प्रकार उघड झालाय. मनिष गुप्ता यांच्या पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये त्यांना गंभीर दुखापती झाल्याचं स्पष्ट झालंय. तसेच काठीने मारहाण केल्याचे वळही सापडले आहेत. डोक्यावर आघात होऊ झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचंही अहवालात म्हटलं आहे.

मारहाण आणि हत्येप्रकरणी ६ पोलीस निलंबित

सुरुवातीला मनिष गुप्ता यांच्या मृत्यू प्रकरणात गोरखपूर पोलिसांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. तसेच उलट गुप्ता आणि त्यांच्या मित्रांचीच चौकशीची भाषा केली. मात्र, देशभरात हे प्रकरण चर्चेत आलं आणि शवविच्छेदन अहवालाने मारहाणीला दुजोरा दिल्यानंतर आता आरोपी ६ पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय. मात्र, अद्याप या प्रकरणात एकही अटक झालेली नाही.

IAS अधिकाऱ्यासमोरच धर्मपरिवर्तनाची शिकवण? उत्तर प्रदेशमधील व्हिडीओ व्हायरल! चौकशीचे आदेश