उत्तर प्रदेशमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला असून त्यात एका आयएएस अधिकाऱ्याच्या उपस्थितीतच धर्मपरिवर्तनाचे फायदे समजावून सांगितले जात असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यावरून वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी असा कोणताही व्हिडीओ सरकारच्या निदर्शनास आला नसल्याचा दावा केला आहे. तसेच, अशी कोणतीही घटना घडली असेल, तर त्याची गांभीर्याने चौकशी केली जाईल, असं देखील मौर्य म्हणाले आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होण्याची शक्यता आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडीओ ज्येष्ठ आयएएस अधिकारी मोहम्मद इफ्तखारूद्दीन यांच्या सरकारी निवासस्थानातील आहे. यामध्ये धर्मपरिवर्तन आणि त्याच्याशी संबंधित बाबी सांगितल्या जात आहेत. यात एक इस्लामिक गुरू समोर खुर्चीवर बसले असून त्यांच्यासमोर जमिनीवर काही मुस्लिम बांधव बसले आहेत. त्यांच्यामध्येच आयएएस अधिकारी मोहम्मद इफ्तखारुद्दीन देखील बसलेले दिसत आहेत. खुर्चीवर बसलेले इस्लामिक गुरू इस्लाम धर्म स्वीकारण्याचे फायदे सांगत आहेत. उत्तर प्रदेशच्या माध्यमातून अल्लाहने आपल्याला असं केंद्र उपलब्ध करून दिलं आहे, जिथून आपण देशभर आणि जगभर काम करू शकतो, असं म्हणताना देखील हे इस्लामिक गुरू दिसत आहेत.

व्हिडीओची सत्यता पडताळून पाहणार

दरम्यान, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर मठ मंदिर सहकारी समितीचे उपाध्यक्ष भूपश अवस्थी यांनी आयएएस अधिकारी मोहम्मद इफ्तखारूद्दीन यांच्यावर हिंदुत्वविरोधी कारवाया करण्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात कानपूरचे पोलीस आयुक्त असीम अरुण गावे यांनी अतिरिक्त उपायुक्त सोमेंद्र मीणा यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. “आयएएस अधिकारी मोहम्मद इफ्तखारुद्दीन यांचा हा व्हायरल व्हिडीओ तपासला जात आहे. हा व्हिडीओ खरा आहे का आणि त्यामध्ये काही गुन्हा घडला आहे का? याची चाचपणी केली जात आहे”, अशी माहिती कानपूर नगर पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे.

कोण आहेत हे IAS अधिकारी?

मोहम्मद इफ्तिखारुद्दीन हे १९८५ सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या ते लखनऊमध्ये पोस्टिंगवर आहेत. त्यांच्याकडे उत्तर प्रदेश राज्य रस्ते परिवहन महामंडळाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.