Delhi Oxygen Audit Committee Report: सुप्रीम कोर्टाच्या ऑक्सिजन ऑडिट समितीने दिलेला अहवाल अस्तित्वातच नसून हा भाजपाने तयार केला आहे असा गंभीर आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला आहे. ऑक्सिजन ऑडिट समितीने दिलेल्या अहवालात गेल्या महिन्यात करोनाची दुसरी लाट आलेली असताना आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला असताना दिल्ली सरकारने गरजेपेक्षा चौपट ऑक्सिजनची मागणी केल्याचं वृत्त आहे.

हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं सांगताना मनिष सिसोदिया यांनी अहवालात नमूद करण्यात आलेली माहिती फेटाळून लावत भाजपाने आपल्या पक्षाच्या मुख्यालयात हा अहवाल तयार केल्याचा आरोप केला आहे. “असा कोणताही अहवाल नसून तो अस्तित्वातच नाही. भाजपा खोटं बोलत आहे. आम्ही ऑक्सिजन ऑडिट समितीशी बोललो आहेत. त्यांनी आम्ही स्वाक्षरी केल्याचं किंवा मंजुरी दिलं नसल्याचं सांगितल आहे,” अशी माहिती मनिष सिसोदिया यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.

दिल्ली सरकारनं गरजेपेक्षा चौपट अधिक ऑक्सिजनची मागणी केलेली; सुप्रीम कोर्टाच्या समितीचा अहवाल

“जर सदस्यांनी स्वाक्षरीच केली किंवा संमतीच दिली नसेल तर मग हा अहवाल आला कुठून? हा अहवाल आहे कुठे?,” अशी विचारणा मनिष सिसोदिया यांनी केली आहे. मनिष सिसोदिया यांनी यावेळी समितीने स्वाक्षरी केलेला अहवाल सादर करण्याचं आवाहनदेखील दिलं आहे.


“भाजपा आपल्या मुख्यालयात तयार केलेला खोटा अहवाल सादर करत आहे. मी त्यांना सदस्यांनी स्वाक्षरी केलेला असा अहवाल समोर आणण्याचं आव्हान देत आहे,” असं मनिष सिसोदिया यांनी म्हटलं आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत खरंच राजधानीत ऑक्सिजनचा तुटवडा होता सांगताना मनिष सिसोदिया यांनी यावेळी केंद्रावर योग्य व्यवस्था न केल्याची टीका केली. “करोना महामारीने शिखर गाठलं असता राजधानीत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता याची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे. राज्यांन ऑक्सिजन पुरवठा करताना जो गोंधळ झाला त्यासाठी केंद्रच जबाबदार आहे,” असं मनिष सिसोदिया यांनी यावेळी म्हटलं.

“खोटा अहवाल तयार करुन भाजपा फक्त मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची बदनामी करत नसून केंद्राने ऑक्सिजनची योग्य व्यवस्था न केल्याने सदस्य गमावलेल्या कुटुंबीयांचादेखील अपमान करत आहेत,” असं मनिष सिसोदिया म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनिष सिसोदिया यांनी यावेळी ऑक्सिजनसाठी धावपळ करणारे नातेवाईक, डॉक्टर्स, रुग्णालयं खोटे बोलत होते का? अशी विचारणा करत भाजपा आणि त्यांचे नेते खोटं बोलत असल्याचा आरोप केला आहे.