भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर सध्या सुरू असलेल्या घडामोडी उभय देशांमधील संबंधांसाठी मारक आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही, उशीर झालेला असला तरी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी नियंत्रण रषेवर काय चाललंय, याकडे ‘लक्ष द्यावे’, अशा शब्दांत पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी नवाझ शरीफ यांना फटकारले. तसेच पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे आपण व्यथित झालो आहोत, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
न्यूयॉर्क येथे आमच्या भेटीत दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तसेच आंतरराष्ट्रीय सीमेवर शांततामय वातावरण राहील याची काळजी घेण्याची हमी परस्परांना दिली होती. मात्र सातत्याने गेले काही महिने पाकिस्तानकडून सीमेवर होणारे हल्ले अत्यंत दुखद आहेत. आणि त्यामुळे आपण निराश झालो आहोत, असे पंतप्रधानांनी चीनहून परतताना त्यांच्या विशेष विमानात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
या कसोटीच्या क्षणी नवाझ शरीफ यांनी या घटनांचे गांभीर्य ओळखावे आणि असे वारंवार केले जाणारे हल्ले उभय देशांमधील संबंध सुधारण्यास मारक आहेत, हेही त्यांनी लक्षात घ्यावे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी व्यक्त केली.