KKR Team IPL Champion For Third Time : आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यात रविवारी कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला. यासह केकेआरने तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. सामना संपल्यानंतर कोलकात्याच्या खेळाडूंच्या आनंदाला पारावार उरला नाही. नेहमी गंभीर दिसणारा गौतम गंभीरही खूप आनंदी दिसत होता. एवढेच नाही तर मालक शाहरुख खानने केकेआरच्या खेळाडूंवर खूप प्रेमाचा वर्षाव केला. संपूर्ण सामन्यात मास्क घालून बसलेल्या शाहरुख खानने आधी मास्क काढला, त्यानंतर तो दुरूनच खेळाडूंशी बोलतानाही दिसला. अशा प्रकारे गोतम गंभीर, मालक शाहरुख खान आणि केकेआर संघाने केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

शाहरुख खानने केकेआरच्या खेळाडूंची घेतली भेट –

केकेआर संघाचा मालक शाहरुख खान आजारी होता. नुकतेच त्याला रुग्णालयातही दाखल करावे लागले होते. यानंतरही तो आपल्या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी फायनल सामन्यासाठी चेपॉक स्टेडियममध्ये पोहोचला. कोलकातानेही आपल्या मालकाला निराश केले नाही आणि ट्रॉफी जिंकल्यानंतर सेलिब्रेशन केले. सामना संपल्यानंतर शाहरुख खानने गौतम गंभीरला मिठी मारली आणि त्याच्या कपाळावर चुंबनही घेतले. यादरम्यान तो सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंना भेटताना दिसला. त्याने सर्व खेळाडूंना मिठी मारली.

केकेआरने १० वर्षांनी तिसऱ्यांदा कोरले ट्रॉफीवर नाव –

कोलकाताने सनरायझर्स हैदराबादचा आठ गडी राखून पराभव केला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला. लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताने व्यंकटेश अय्यर आणि गुरबाज अहमद यांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे सामना जिंकला. रविवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात कोलकाताने बॉल आणि बॅट दोन्हीसह चमकदार कामगिरी केली आणि पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाला कधीही वरचढ होऊ दिले नाही. कोलकाताने याआधी २०१४ च्या मोसमात पंजाब किंग्जचा पराभव करून शेवटचे विजेतेपद पटकावले होते आणि आता १० वर्षांनंतर संघाने पुन्हा ट्रॉफीवर कब्जा केला आहे.

हेही वाचा – IPL 2024 Final : एमएस धोनीच्या ‘होम ग्राउंड’ने रचला इतिहास, चेपॉक स्टेडियमने नोंदवला ‘हा’ खास पराक्रम

सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १८.३ षटकात सर्व १० गडी गमावून ११३ धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 24 धावांची खेळी खेळली. केकेआरचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने शानदार गोलंदाजी केली. त्याने २.३ षटकात ७.६च्या इकॉनॉमीसह १९ धावा दिल्या आणि ३ बळीही घेतले. त्यांच्याशिवाय हर्षित राणा आणि मिचेल स्टार्कने प्रत्येकी २ बळी घेतले. प्रत्युत्तरात कोलकाताने १०.३ षटकांत २ गडी गमावून ११४ धावा केल्या. व्यंकटेश अय्यरने अर्धशतक (५२) केले. रहमानउल्ला गुरबाजने ३२ चेंडूत ३९ धावांची खेळी साकारली.