राष्ट्रपती निवडणूक
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी आज, सोमवारी जे ५५ खासदार संसद भवनाऐवजी त्यांच्या राज्यातील विधानसभेत मतदान करतील, त्यांच्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचाही समावेश असल्याचे निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांत नमूद केले आहे.
पाच आमदार संसद भवनात मतदानाचा हक्क बजावणार असून, आणखी ४ आमदार असे आहेत, जे ज्या विधानसभेत निवडून आले नाहीत त्या ठिकाणी मतदान करणार आहेत.
सहसा राष्ट्रपती निवडणुकीत खासदार संसद भवनात, तर आमदार त्यांच्या संबंधित विधानसभेत मतदान करतात. या निवडणुकीच्या नियमांनुसार लोकप्रतिनिधी आपल्याला इतरत्र मतदान करू द्यावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करू शकतात.
राज्यसभेच्या १४, तर लोकसभेच्या ४१ खासदारांना सोमवारी संसद भवनाऐवजी राज्य विधानसभांमध्ये मतदान करण्याची परवानगी देण्यात आली असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. त्यात अद्याप लोकसभेचे सदस्यत्व न सोडलेले पर्रिकर, आदित्यनाथ व उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा समावेश आहे. पर्रिकर हे राज्यसभेचे, तर इतर दोघे लोकसभेचे सदस्य आहेत. खासदार हे हिरव्या रंगाच्या, तर आमदार गुलाबी रंगाच्या मतपत्रिकेवर मतदान करतील. खासदाराच्या मताचे मूल्य ७०८ इतके असून, आमदाराच्या मताचे मूल्य तो प्रतिनिधित्व करत असलेल्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असते.