गीतकार मनोज मुंतशिर यांनी मुघल शासकांना लुटारु म्हटलं आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन येथे आयोजित गौरव दिवस कार्यक्रमात मुघलांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी आपल्याला चुकीचा इतिहास शिकवण्यात आल्याचं म्हटलं. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “आपल्याला सांगण्यात आलं की, शेरशाह सुरी, अकबर आणि खिलजी यांच्यासारखे शासक नसते तर आपण झाडांची पानं लावून नाचलो असतो, पण या मुर्खांना कोणा सांगणार की यांच्या आधी इथे मोहेंजदडो पण होतं”, असं ते म्हणाले.

यावेळी त्यांनी कार्यक्रमात उपस्थित लोकांना सांगितलं की, “हजारो वर्ष आधी जेव्हा मुघल नव्हते तेव्हा आमच्याकडे महाकाल मंदिर तयार झालं होतं. मुघलांनी २ विटाही जोडणं शिकलेलं नव्हतं तेव्हा आमच्या क्षत्रिय राजांनी उभारलेली मंदिरं होती. अजंठा आमच्याकडे आहे, एलोरा आमच्याकडे आहे आणि कोणार्कही आहे”.

“कदाचित तुम्हा लोकांना माहिती नाही, पण जेव्हा आपल्या देशात ३५ लाख लोकांनी उपासमारीमुळे आपला जीव गमावला होता तेव्हा एक बादशाह तेव्हाचे नऊ कोटी रुपये एका थडग्यावर खर्च करत होता. त्या नऊ कोटी रुपयांनी देशाची उपसमार थांबली असती,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, “एका बाजूला आपण विक्रमादित्य यांना पाहिलं आणि एका बाजूला महान लुटारु, दरोडेखोरांनाही पाहिलं हे आपलं दुर्भाग्य आहे. ताजमहाल बनवला तर ठीक आहे, पण आता आपल्याला तो प्रेमाचं प्रतिक आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत केला जात आहे”. या राजांनी आपल्या गरिबीची खिल्ली उडवली आणि आता त्याला प्रेमाचं प्रतिक म्हणत असल्याचंही ते म्हणाले.

“प्रेमाचं प्रतिक जाणून घ्यायचं असेल तर चित्तोड किल्ल्याचा इतिहास जाणून घ्या जिथे माता पद्मिनीने राजा रतन सिंह यांच्यासाठी अग्नीत स्वत:ला झोकून दिलं. प्रेम समजून घ्यायचं असेल तर प्रभू श्रीरामाने सीतेसाठी समुद्रात पूल उभारला त्याचा अभिमान बाळगा. हे प्रेमाचं प्रतिक आहे,” असं मनोज मुंतशिर म्हणाले.

यावेळी त्यांनी सलीम-अनारकली आणि जोधा-अकबर यांच्या प्रेमाच्याही खोट्या गोष्टी सांगितल्या जात असल्याचं म्हटलं. आता या सर्व दंतकथा मिटवण्याची वेळ आली आहे. तुमच्याकडे तुमचे नायक आहेत आणि आता असे मागितलेले नायक नकोत. प्रेम शिकायचं असेल तर प्रभू श्रीरामाककडून शिका असा सल्ला त्यांनी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण आहेत मनोज मुंतशिर-

मनोज मुंतशिर हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध गीतकार आहेत. त्यांनी अनेक संवादही लिहिले आहेत. मनोज मुंतशिर यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अमेठीत झाला आहे आणि त्यांचं खरं नाव मनोज शुक्ला आहे. बाहुबली चित्रपटातील सर्व संवाद त्यांनीच लिहिले आहेत. रुस्तम चित्रपटातील “तेरे संग यारा” गाणंही त्यांनीच लिहिलं आहे. मनोज मुंतशिर देशातील चर्चेत असणाऱ्या तसंच वादग्रस्त मुद्द्यांवर नेहमी आपलं मत मांडत असतात.