नवी दिल्ली : पश्चिम आशियातील तणावपूर्ण स्थितीचा फटका जगभरातील विमान उड्डाणांना बसला असून, ‘एअर इंडिया’सह जगभरातील अनेक विमान कंपन्यांनी उड्डाणे रद्द केली. प्रवाशांना झालेल्या त्रासाबरोबरच विमान कंपन्यांनाही मोठा आर्थिक फटका बसला. मात्र, युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर आता बुधवारपासून पश्चिम आशियातील विमान उड्डाणे पुन्हा टप्प्याटप्प्याने सुरू करत असल्याचे ‘एअर इंडिया’कडून सांगण्यात आले.

‘इंडियन एअरलाइन्स’ने पश्चिम आशियातील उड्डाणे रद्द केली आहेत. ‘एअर इंडिया’च्या अनेक विमानांना सध्या तांत्रिक समस्या भेडसावत आहेत. त्याचा फटका उड्डाणांना बसत आहे. याबरोबरच ‘एअर इंडिया’ने पश्चिम आशियासह युरोपातील उड्डाणे तात्पुरती रद्द केली होती. ती आता पुन्हा सुरू होत आहेत. अमेरिका, कॅनडामधील पाच ठिकाणी जाणारी उड्डाणेही ‘एअर इंडिया’ने रद्द केली. या भागात १५ ठिकाणी कंपनीकडून विमानसेवा दिली जाते.

‘एअर इंडिया’ आणि ‘इंडिगो’ कंपन्यांनी दिल्ली विमानतळावरून उडणारी किमान २० उड्डाणे सोमवारपासून रद्द केली. तसेच, दिल्लीला येणारी २८ विमानेही रद्द केली.. पश्चिम आशियातील देशांची विमानतळे जशी खुली होत आहेत, तशी सेवा सुरू करीत आहोत, असे ‘इंडिगो’ने म्हटले आहे. ‘स्पाइसजेट’नेही हवाई हद्द बंद असल्याचा फटका काही उड्डाणांना बसेल, असे म्हटले आहे.

एअर इंडियावर सर्वाधिक परिणाम

न्यूयॉर्क : ‘फ्लाइटअवेअर’वरील ‘एअर ट्रॅकिंग’ डेटानुसार जगभरात २४३ उड्डाणे मंगळवारी रद्द झाली. यामध्ये सर्वाधिक २६ उड्डाणे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून झाली. तर, सर्व कंपन्यांमध्ये ‘एअर इंडिया’ची सर्वाधिक २५ उड्डाणे रद्द करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिम आशियातील परिस्थिती पाहता ‘एअर इंडिया’ने या भागातील सर्व उड्डाणे, उत्तर अमेरिकेचा पूर्व किनारा आणि युरोपमध्ये जाणारी आणि तेथून परतणारी सर्व उड्डाणे पुढील सूचना येईपर्यंत तातडीने बंद केली आहेत. उत्तर अमेरिकेतून भारताकडे येणारी विमाने पुन्हा माघारी परतली आहेत. इतर विमाने भारताकडे परतली आहेत. – एअर इंडिया