Jammu & Kashmir Floods: जम्मू आणि काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, ढगफुटी आणि भूस्कलनामुळे किमान चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दोडाचे उपायुक्त हरविंदर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, घर कोसळून दोघांचा तर तर पूरामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या भागातील अनेक घरे आणि रस्ते उध्वस्त झाले आहेत. प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी नदीकाठच्या रहिवाशांना तिथून दूर जाण्याचे आवाहन केले आहे.

कटरा जवळील त्रिकुटा टेकड्यांवरील वैष्णोदेवी तीर्थयात्रा स्थगित केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

प्रमुख रस्ते आणि रेल्वे सेवा बंद

मुसळधार पावसामुळे रस्त्याचा मोठा भाग वाहून गेल्याने दोडा आणि किश्तवारला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. २४४ वरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. विविध ठिकाणी भूस्खलन झाल्यानंतर जम्मू-पूंछ महामार्गावरून वाहनांची वाहतूक रोखण्यात आली आहे.

दोडाचे उपायुक्त हरविंदर सिंग यांनी पुढे सांगितले की, दोडा-भादेरवाह, थाथरी-तांता आणि धारा-जई दरम्यानचे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. मुसळधार पावसामुळे सतरा घरे आणि काही सरकारी मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.

दोडा जिल्ह्यातील मामत आणि गंडोह भागात सर्वाधिक नुकसान झाल्याची नोंद आहे, असेही त्यांनी सांगितले.

जम्मू शहरातील तावी नदी २७ फूट वेगाने वाहत असून धोक्याच्या पातळीपेक्षा १० फूट अधिक असल्याची माहिती देण्यात येत आहे. अखनूर येथे चिनाब नदी ३५.६ फूट वेगाने वाहत असून ती धोक्याच्या पातळीहून अर्धाफूट अधिक असल्याची माहिती मिळत आहे.

एसडीआरएफ, पोलीस आणि नागरी संस्था बचाव कार्यात सहभागी झालेल्या आगेत. त्यांनी तावी आणि चिनाब नदीच्या काठावरील सखल भागातील लोकांना बाहेर पडण्यास सांगितले आहे. तसेच मानवतावादी भूमिका म्हणून भारताने पाकिस्तानला रविवारी पूराची पूर्वकल्पना दिली होती.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी परिस्थिती खूपच गंभीर असल्याचे म्हटले आहे. आपत्कालीन परिस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी ते स्वतः जम्मूला जात आहेत, याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत माहिती दिली.