पीटीआय, नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष व नेते राहुल गांधी यांच्यावर माओवादी विचारप्रणाली व अराजकवादी तत्त्वांचा पगडा असल्याची आपली खात्री झाल्याची टीका भाजपने मंगळवारी केली. विदेशात भारतीय लोकशाहीची स्थिती व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्यामुळे राहुल गांधी यांना भाजपने लक्ष्य केले. माजी केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही टीका केली.

रविशंकर प्रसाद म्हणाले, की राहुल गांधींनी ब्रिटिश लोकप्रतिनिधीगृहाच्या व्यासपीठाचा दुरुपयोग करून धादांत खोटी वक्तव्ये व निराधार दावे केले आहेत. आम्ही ते सर्व फेटाळत असून, या आरोपांचे योग्य खंडन करण्याची गरज आहे. राहुल यांनी भारतीय लोकशाही, संसद, न्यायव्यवस्था व राजकीय प्रणाली, व्यूहात्मक सुरक्षा धोरणांसह भारतीय जनतेचाही विदेशात अपमान केला आहे.

राहुल यांनी सोमवारी लंडनस्थित लोकप्रतिनिधीगृहाच्या परिसरात ब्रिटिश लोकप्रतिनिधींना संबोधित करताना म्हंटले होते, की भारतातील लोकसभेत विरोधी पक्षांसाठी ध्वनिक्षेपक नेहमी बंद केला जातो. ‘हाऊस ऑफ कॉमन्स’च्या ‘ग्रँड कमिटी रूम’मध्ये विरोधी मजूर पक्षाचे भारतीय वंशाचे खासदार वीरेंद्र शर्मा यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी म्हणाले की, संसदेत आवश्यक मुद्दय़ांवर चर्चाही होऊ दिली जात नाही. यावर रविशंकर प्रसाद म्हणाले की, परदेशात भारतावर टीका करून राहुल गांधी सर्व प्रतिष्ठा, शालीनता आणि लोकशाही मर्यादा विसरले आहेत. यामुळेच भारतीय नागरिक त्यांना पाठिंबा देणे तर दूरच त्यांना गांभीर्यानेही घेत नाहीत.

युरोप व अमेरिकेने भारताच्या अंतर्गत बाबींत हस्तक्षेपाचे आवाहन करून राहुल गांधींनी देशासाठी लाजिरवाणी स्थिती आणण्याचा प्रयत्न केला. राहुल यांच्या बेजबाबदार वक्तव्यांचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व माजी अध्यक्ष सोनिया गांधी समर्थन करणार की ती फेटाळणार? असा सवाल विचारून रविशंकर यांनी संघावर राहुल यांनी केलेल्या टीकेचाही समाचार घेतला. ते म्हणाले, की संघाने देशसेवा, देशभक्ती आणि समर्पित वृत्तीने राष्ट्रकार्य केले आहे. नेहरूजी, इंदिराजीही व राजीवजीही संघावर टीका करायचे. मात्र, संघ कुठून कुठे पोहोचला व तुमची काय अवस्था झाली आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘अबकी बार, ट्रम्प सरकार’चा भाजपला विसर- रमेश

भाजपने राहुल गांधींवर केलेल्या टीकेस प्रत्युत्तर देताना काँग्रेसने मंगळवारी म्हटले, की, ते राहुल यांच्या वक्तव्यांचा विपर्यास करत आहेत. पूर्वी दिलेल्या ‘अबकी बार, ट्रम्प सरकार’ अशा आवडत्या घोषणा भाजप विसरलेला दिसतो. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘ट्वीट’ केले, की भाजपचे नेते व माजी मंत्री रविशंकर प्रसाद हे त्यांच्या पक्षाच्या ‘सर्वेसर्वा’प्रमाणेच बदनामी करण्याचे व धादांत खोटे बोलण्याचे काम करत आहेत. काँग्रेसचे प्रसिद्धीमाध्यम विभागप्रमुख पवन खेरा यांनी प्रसाद यांची खिल्ली उडवत म्हटले, की सत्ताधारी पक्षाचा ‘बेरोजगार’ नेता प्रसंगानुरूप टीका करून ‘रोजगार’ मिळवण्याचा प्रयत्न करतो, यापेक्षा अधिक मनोरंजक अन्य काही असू शकत नाही. जे लोक राहुल यांच्या वक्तव्याचा विपर्यास करत आहेत, ते ‘अबकी बार, ट्रम्प सरकार’ या आपल्या आवडत्या घोषणा सोयीस्कररित्या विसरले आहेत.