Donald Trump Israel-Hamas 20 Points Peace Plan: गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इस्रायल व गाझा यांच्यातील युद्धबंदीबाबत सातत्याने भूमिका मांडत होतं. काही दिवसांपूर्वीच त्यांनी या दोन्ही देशांमधील युद्ध थांबवण्यासाठी २० कलमी शांतता प्रस्ताव मांडला. गुरुवारी दोन्ही देशांनी या शांतता प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्याला मान्यता दिल्याचं खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनीच ट्रुथ या सोशल साईटवरील आपल्या पोस्टमध्ये जाहीर केलं. भारत-पाकिस्तान संघर्षामध्ये ज्याप्रमाणे या दोन्ही देशांच्याही आधी ट्रम्प यांनी संघर्ष थांबल्याचं जाहीर करून टाकलं, त्याचीच पुनरावृत्ती आता इस्रायल-गाझा संघर्षात झाल्याचं पाहायला मिळालं. पण या घोषणेच्या साधारण दोन तास आधी ट्रम्प यांना एक चिठ्ठी आली होती!

इस्रायल-गाझाच्या सहमतीने युद्धबंदी

गुरुवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी रात्री ८ च्या सुमारास दोन्ही देशांनी शांतता प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्याला मान्यता दिल्याचं जाहीर केलं. “मला हे जाहीर करायला अत्यंत अभिमान वाटतोय की इस्रायल व हमासने शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्याला सहमती दर्शवली आहे. आता सर्व ओलिसांची लवकरच सुटका केली जाणार असून इस्रायल त्यांचं सैन्य सहमती दर्शवलेल्या रेषेपर्यंत मागे घेईल. या प्रक्रियेमध्ये आम्हाला सहकार्य करणाऱ्या कतार, इजिप्त आणि तुर्किये या देशांचे आम्ही आभार मानतो”, असं ट्रम्प यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

याआधीही भारत-पाकिस्तान संघर्षात आपणच मध्यस्थी करून शांतता प्रस्थापित केली, असा दावा ट्रम्प यांनी वारंवार केला आहे. खुद्द भारतानं यासंदर्भात अमेरिकेचा दावा फेटाळून लावताना भारत व पाकिस्तान वगळता इतर कोणतेही देश या प्रक्रियेत सहभागी नव्हते, असं स्पष्ट केलेलं असतानाही ट्रम्प यांनी त्यांचा दावा कायम ठेवला आहे. शिवाय, ते वारंवार तो दावा बोलूनही दाखवत आहेत. सर्वात आधी अशा घोषणा करण्याचा त्यांचा प्रयत्नच मार्को रुबियो यांनी त्यांच्याकडे पाठवलेल्या चिठ्ठीतून दिसून आला!

ट्रम्पना चिठ्ठी मिळाली आणि घोषणा झाली!

गुरुवारी संध्याकाळी डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमधील ‘ब्लू रूम’मध्ये बैठकीत व्यग्र असतानाच अमेरिचे अंतर्गत सुरक्षा मंत्री मार्को रुबियो तिथे आले. त्यांना ट्रम्प यांनी आत बोलावलं आणि विचारणा केली. तेव्हा रुबियो यांनी ट्रम्प यांच्या हातात काही मजकूर लिहिलेला एक पांढरा कागद ठेवला आणि त्यांच्या कानात काहीतरी सांगितलं. या कागदावर ट्रम्प यांनी तातडीने त्यांच्या सोशल मीडियासाठी तयार करण्यात आलेली पोस्ट मंजूर करण्याची विनंती करण्यात आली होती.

“आपण सहमतीच्या अंतिम टप्प्यावर आहोत. तुम्ही TRUTH वरील सोशल पोस्ट मंजूर करावी, अशी आमची अपेक्षा आहे, जेणेकरून तुम्हाला या सहमतीबाबत आधी घोषणा करता येईल”, असं या चिठ्ठीत लिहिलेलं होतं.

चिठ्ठी येताच १० मिनिटांत ट्रम्प उठले…

दरम्यान, चिठ्ठी मिळताच ट्रम्प यांनी पुढच्या १० मिनिटांत बैठक आटोपती घेतली, सहकाऱ्यांना पुढील बैठकीच्या सूचना दिल्या आणि ते रुबियो यांच्यासोबत निघून गेले. संध्याकाळी ६ च्या सुमारास हे सगळं घडल्यानंतर पुढच्या दोन तासांत ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ अकाऊंटवर शांतता प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्यावर दोन्ही बाजूंनी सहमती झाल्याची घोषणा केली. इस्रायल किंवा गाझामधून कोणतीही अधिकृत घोषणा होण्याआधी!