Supreme Court on Divorce: लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची बाब असते. बदललेल्या काळानुसार आता लग्नानंतर जोडप्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. जीवनशैलीतील बदल, कामाचा ताण, एकत्र कुटुंबपद्धतीत राहण्यास नकार यामुळे अनेक जोडप्यांमध्ये वाद होताना दिसतात. वाद इतके विकोपाला जातात की, त्याचा शेवट न्यायालयात होतो. न्यायालयासमोर अशाप्रकारचे हजारो प्रकरणे येत असतात. सर्वोच्च न्यायालयात अशाच एका प्रकरणाची सुनावणी झाली असता न्यायाधीश अभय ओक यांनी संबंधित जोडप्याचे समुपदेशन केले.

“एखाद्याचे लग्न तुटले याचा अर्थ त्याचे आयुष्य संपले असे होत नाही. सगळे विसरून तुम्ही पुढे जायला हवे”, असा सल्ला न्या. अभय ओक यांनी जोडप्याला दिला.

प्रकरण काय आहे?

न्या. अभय ओक यांच्या खंडपीठासमोर घटस्फोटाच्या प्रकरणाची सुनावणी झाली. मे २०२० मध्ये या जोडप्याचे लग्न झाले होते. लग्नानंतर वाद झाल्यामुळे दोघांनीही एकमेकांवर १८ खटले दाखल केले होते. सर्वोच्च न्यायालयाने हे खटले रद्दबातल ठरवत दोघांनाही आयुष्यात पुढे जाण्याचा सल्ला दिला. खंडपीठाने म्हटले, “दोन्ही पक्षकार तरूण आहेत. त्यांनी आता भविष्याकडे पाहिले पाहिजे. जर लग्नात अपयश आले असले तरी हा आयुष्याचा शेवट नाही. दोघांनीही आता नव्या आयुष्याची सुरुवात करायला हवी.”

जोडप्याने यापुढील काळात शांततेत जगावे, असाही सल्ला खंडपीठाने दोघांना दिला. अनेक दुर्दैवी प्रकरणांपैकी हे एक प्रकरण असल्याचे खंडपीठाने म्हटले. लग्न झाल्यानंतर एक वर्षाच्या आतच विवाहितेने सासरचे घर सोडले होते. पती आणि सासरच्या लोकांकडून सतत छळ होत असल्याचा आरोप विवाहितेने केला. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू मांडणाऱ्या वकिलांना सल्ला दिला की, या खटल्यात पडणे निरर्थक ठरू शकते. कारण हे वर्षानुवर्ष चालत राहील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर वकिलांनी संविधानाच्या कलम १४२ अंतर्गत न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात सदर लग्न विसर्जित करण्याची विनंती केली. मे २०२० मध्ये लग्न झाल्यानंतर काही महिन्यातच विवाहितेने सासर सोडून माहेरी राहू लागली होती.