उमाकांत देशपांडे
लग्नसराई, भ्रमंतीसाठी मोठय़ा संख्येने मतदार मुंबईबाहेर जाण्याची शक्यता
मुंबई-ठाण्यातील मतदान २९ एप्रिलला होणार आहे. या तारखेस जोडून चार-पाच दिवसांच्या सलग सुट्टय़ांमुळे हजारो मुंबईकरांनी परगावी जाण्याचे नियोजन केल्याने अनेक उमेदवार धास्तावले आहेत.
मुंबई-ठाण्याच्या मतदानाआधी २७-२८ एप्रिलला चौथा शनिवार व रविवारची अनेकांना सुट्टी आहे. २९ एप्रिलला मतदानाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नोकरदारांनी ३० एप्रिलला एक सुट्टी घेतली की १ मे रोजी पुन्हा सार्वजनिक सुट्टी आहे. या पाच दिवसांच्या सलग सुट्टय़ांमुळे अनेकांनी मुंबई-ठाण्याबाहेर जाण्याचे नियोजन केले आहे.
२७ आणि २८ एप्रिलला विवाह मुहूर्त असल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. या विवाह मुहूर्तामुळे परगावी गेलेल्या मुंबई-ठाणेकरांना पुन्हा लगेच २९ एप्रिलला परतणे शक्य नाही. २७ एप्रिलपासून एसटी, रेल्वेगाडय़ांची आरक्षणे फुल्ल झाल्याचे या व्यवस्थापनांकडून सांगण्यात आले. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सचे आरक्षणही मोठय़ा प्रमाणावर होत असून लहान गाडय़ाही भाडय़ाने घेण्यात येत आहेत. त्यांचेही दर वाढविण्यात आले आहेत.
अनेक खासगी शाळांचे पहिली ते नववीचे निकाल २७ एप्रिलला जाहीर होणार आहेत. त्यामुळे निकाल जाहीर झाल्यावर लग्नसराई व पर्यटनासाठी परगावी जाण्यासाठी हजारो लोकांनी नियोजन केले आहे. सरकारने शाळांच्या अधिकृत सुट्टय़ा ५ मेपासून जाहीर केल्या असल्या तरी पाल्यांचे निकाल जाहीर झाल्यावर मतदानासाठी न थांबता मुंबईकर बाहेरगावी जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.
मतदानानंतरच मुंबईबाहेर जाण्याचे आवाहन
मुंबई-ठाणेकरांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडूनच बाहेरगावी जावे, मतदान चुकवू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले. भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनीही सर्व मतदारांना आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन केले.
