Martyr surendra mogas 11 year old daughter Video : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने याला जोरदार प्रत्युत्तर दिले. ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारतीय लष्कराने एअर स्ट्राईक केल्या. या हल्ल्यात १००हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. यानंतर पाकिस्तानने आगळीक करत नियंत्रण रेषेवर ड्रोन आणि मिसाईल यांच्या माध्यामातून हल्ला केला. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे काही जवान तसेच नागरिकांचा देखील मृत्यू झाला.

उधमपूर येथे सुरेंद्र मोगा यांना वीर मरण

राजस्थानमधील झुंझुनू येथील सुरेंद्र मोगा हे भारतीय हवाई दलात वैद्यकीय सहाय्यक सार्जंट म्हणून जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर येथे तैनात होते. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात ते शहीद झाले. सुरेंद्र कुमार मोगा यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी सीमा, ११ वर्षांची मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. मोगा शहीद झाल्यानंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. यादरम्यान सार्जंट मोगा यांच्या ११ वर्षीय मुलीने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना वर्तिकाने आपल्या वडीलांबद्दल अभिमान वाटत असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर तिने आपण सैन्यात भरती होऊन वडीलांचा बदला घेऊ असेही म्हटले आहे.

मुलीची भावनिक प्रतिक्रिया

वर्तिका म्हणाली की, “मला खूप अभिमान वाटत आहे. माझे वडील खूप चांगले होते. शत्रूंचा खात्मा करताना ते स्वत: शहीद झाले, पण मा‍झ्या वडीलांनी देशाचे रक्षण केले.” तिने पुढे बोलताना सांगितले की, रात्री ९ वाजता तिचे वडिलांशी शेवटचे बोलणं झालं होतं. त्यांनी सांगितलं की, येथे काही घडत नाहीये. ड्रोन फिरत आहेत पण त्यांच्याकडून हल्ला केला जात नाहीये.

“पाकिस्तान नष्ट करायचा आहे. पाकिस्तानचे नाव देखील शिल्लक राहिले नाही पाहिजे. पूर्ण पाकिस्तान नष्ट केला पाहिजे. मला वडीलांप्रमाणे लष्करात जायचे आहे. मी मा‍झ्या वडीलांचा बदला घेईन,” असेही वर्तिका या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे.

रविवारी रात्री शहीद सुरेंद्र मोगा यांचे पार्थिव झुंझुनूं येथील मांडवा येथे पोहचले. मांडवा येथील मेहरादासी गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्यने नागरिक आणि तरुण जमा झाले होते. यावेळी या गावापर्यंत तब्बल १० किमी तिरंगा यात्रा काढण्यात आली.