जर अवघ्या १४ वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स तुम्ही विकत घेतले असते, तर आजच्या घडीला तुम्हाला जवळपास तब्बल ८००० टक्के इतका प्रचंड परतावा मिळाला असता. म्हणजे समजा तुम्ही या कंपनीचे अवघे १०० शेअर्स त्यावेळी विकत घेतले असतेत तर तुम्हाला प्रति शेअर फक्त १२५ रुपये मोजावे लागले असते आणि १२,५०० रुपयांची गुंतवणूक झाली असती. आज या शेअरचा भाव आहे, १० हजार रुपये, म्हणजे आज त्या गुंतवणुकीचे म्हणजे १०० शेअर्सचे बाजारमूल्य आहे १० लाख रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही कथा आहे मारुति कंपनीच्या शेअरची. २००३ मध्ये सरकारनं मारुतिमध्ये निर्गुंतवणूक केली आणि २५ टक्के समभाग लोकांना विकले, १२५ रुपये प्रति शेअर या भावानं. पहिल्याच दिवशी म्हणजे ०९ जुलै २००३ मध्ये हा शेअर ३२ टक्क्यांनी वधारून १६४ रुपयांवर बंद झाला.
तेव्हापासून आजपर्यंत सैराट सुटलेल्या मारुतिच्या शेअरच्या भावात तब्बल ७९०० टक्के वाढ झाली आहे. कंपनीचं भागभांडवल तीन लाख कोटी रुपयांच्या घरात असून सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या यादीत मारुति पाचव्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांमध्ये म्हणजे २०१२ – १७ या कालावधीत कंपनीच्या समभागाचं मूल्यांकन १.४१ लाख कोटी रुपयांनी वधारलं आहे. हे काहीच नाही, अजूनही मोठा पल्ला हा शेअर गाठू शकतो असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

मारुतिने १९८३ मध्ये सुझुकी कॉर्पोरेशनच्या सहकार्याने कार उत्पादन सुरू केले आणि मारुति ८०० ही गाडी बाजारात आणली.
अल्पावधीतच भारतीय बाजारात छाप उमटवणाऱ्या मारुतिचा आजच्या बाजारातला हिस्सा ५० टक्के आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बदललेल्या भारतीय जीवनशैलीचं प्रतिबिंब मारुतिच्या यशात पडलेलं दिसतं. जवळपास प्रत्येक सेगमेंटमध्ये लोकप्रिय मॉडेल्स आणणाऱ्या मारुतिला ग्राहकांनी चांगलीच पसंती दिली आहे. त्यामुळे कंपनीच्या खपाचे आकडे वाढत राहिले आणि शेअरचा भावही वधारत राहिला.
जर मारुतिची घोडदौड अशीच कायम राहिली आणि भारतीय बाजारही तेजीत राहिला तर मारुतिचा शेअर १४,४०० इतका नजीकच्या काळात वधारू शकतो असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti share price surge 8000 per cent
First published on: 21-12-2017 at 15:39 IST