पीटीआय, लाहोर
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ७ मे रोजी हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद (जेईएम) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर याचे सर्व कुटुंबीय ठार झाले अशी माहिती, या संघटनेच्या एका कमांडरने दिली आहे.
जेईएमचा कमांडर इल्यास काश्मिरी याची एक ध्वनिचित्रफित यूट्यूब वाहिनीवर मंगळवारी अपलोड करण्यात आली. त्यामध्ये तो असे सांगताना ऐकू येते की, भारताच्या हल्ल्यामध्ये अझरचे कुटुंब संपूर्ण नष्ट झाले. त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न झाले. ही माहिती दिल्यानंतर इल्यास काश्मिरी, आपण पाकिस्तानसाठी भारताशी लढाई करत असल्याची फुशारकी मारतानाही दिसत आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये ६ सप्टेंबरला मिशन मोहीम परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये काश्मिरी उर्दूमधून बोलताना ऐकू येते. तसेच, त्याच्या शेजारी अनेक बंदूकधारी व्यक्ती दिसतात.
‘तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीस भारताचा विरोध’
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान तिसऱ्या देशाची मध्यस्थी मान्य करण्यास भारताने नकार दिला होता, अशी माहिती कतारच्या दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री महमूद इशाक दार यांनी मंगळवारी दिली. भारत-पाकिस्तानचा प्रश्न हा द्विपक्षीय मुद्दा असल्याची भारताची भूमिका असल्याचे दार म्हणाले. आपल्या मध्यस्थीनंतर ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात आले, असा दावा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकवेळा केला आहे. तो दार यांनी एक प्रकारे नाकारला. भारतानेही अप्रत्यक्षरित्या तो नाकारला आहे.
या देशाच्या (पाकिस्तान) वैचारिक आणि भौगोलिक सीमांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही दिल्ली, काबूल आणि कंदाहारविरोधात युद्ध पुकारले. सर्व बाबींचा त्याग केल्यानंतर ७ मे रोजी मौलाना मसूद अझरच्या कुटुंबियांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न झाले.– इल्यास काश्मिरीचे ध्वनिचित्रफितीमधील संभाषण