नवी दिल्ली : जगातील अत्यंत संहारक अण्वस्त्रांपैकी एक मानले जाणारे सॅरमॅट आंतरखंडीय क्षेपणास्त्र रशियाने सज्ज ठेवल्याचे वृत्त आहे. त्यामुळे युरोपची चिंता वाढली आहे. स्पूटनिक न्यूजने याबाबत बातमी दिली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या चढाईनंतर आता रशियाची बाजू काहीशी बचावात्मक झाल्याचे दिसत असताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दूरचित्रवाणीवरून देशवासियांना आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे.

रशियाचे आर-एस २८ सॅरमॅट हे एसआय १० आधारित क्षेपणास्त्र आहे. ते १५ आण्विक स्फोटके  वाहून नेण्याच्या क्षमतेचे आहे. नाटोकडून त्याचा उल्लेख सॅटन २ असा केला जातो. या क्षेपणास्त्रामुळे शत्रुला रशियाविरोधात पाऊल उचलण्याआधी दोन वेळा विचार करावा लागेल, असे पुतिन यांनी म्हटले होते.

‘क्रिमिया पुलावरील हल्ल्याचा प्रयत्न उधळला’

कीव्ह : रशियाने शनिवारी दावा केला की, त्यांच्या सैनिकांनी युक्रेनच्या नौदलाचे तीन ड्रोन नष्ट करून क्रिमिया पुलावरील हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावला आहे. हा पूल रशियाला क्रिमिया द्वीपकल्पाशी जोडतो. या मुळे वर्षभरातच हा पूल तिसऱ्या वेळी बंद करावा लागला आहे.