एपी, अझमरिन (सीरिया) : सीरियातील एका दशकाहून अधिक काळ सुरू असलेल्या गृहयुद्धामुळे सीरिया व तुर्कस्तान या दोन्ही देशांना आधीच मोठी झळ पोहोचली आहे. नेमका याच प्रदेशावर भूकंपाने आघात केला असून आधीच विस्थापित झालेले नागरिक रस्त्यावर आले आहेत. 

वायव्य सीरियात इडलिब प्रांताच्या मध्यभागी विरोधकांच्या आधिपत्याखालील प्रदेश वारंवार होणाऱ्या रशियन व सरकारी हवाई हल्ल्यांनी अनेक वर्षांपासून आधीच ग्रस्त आहे. अन्न-धान्यापासून वैद्यकीय पुरवठय़ापर्यंत सर्व गोष्टींसाठी हा प्रदेश लगतच्या तुर्कस्तानवर अवलंबून आहे. भूकंपानंतर विरोधकांच्या ‘सीरियन सिव्हिल डिफेन्स’ने परिस्थितीचे वर्णन ‘विध्वसांचे थैमान’ असे केले आहे. तुर्कस्तान सीमेजवळील पर्वतांमध्ये अझमरिन या सीरियन बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या छोटय़ाशा गावात, पांघरुणांत गुंडाळलेल्या अनेक मृत मुलांचे मृतदेह रुग्णालयात आणले होते.

सीरियात रशिया समर्थित सरकारनियंत्रित भूभाग व लष्कराने वेढलेला बंडखोरांच्या ताब्यातील भाग तसेच तुर्कस्तानमध्ये सीमेलगत सीरियातील सुमारे ४० लाख निर्वासित राहात आहेत. यातील बहुसंख्य नागरिक हे आधीच बॉम्बस्फोटांमुळे तकलादू झालेल्या इमारतींमध्ये राहात होते. भूकंपाच्या धक्क्याने या इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या. विरोधकांच्या ‘व्हाइट हेल्मेट’ नामक आपत्कालीन संस्थेने दिलेल्या निवेदनात नमूद केले, की शेकडो कुटुंबे ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. आरोग्य सुविधा व रुग्णालयांत दाखल जखमींमुळे वैद्यकीय यंत्रणेवर मोठा ताण आल्याचे बचाव कर्मचाऱ्यांनी सांगितले. सीरिया अमेरिकन वैद्यकीय संस्थेच्या म्हणण्यानुसार, प्रसूती रुग्णालयासह इतर वैद्यकीय केंद्रे रिकामी करून जखमींना दाखल करावे लागले. भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या घरांमुळे अतिशीत तापमानात निर्वासितांना आश्रय देण्यासाठी या प्रदेशाच्या आजूबाजूच्या मशिदी उघडण्यात आल्या.

पंतप्रधान मोदींचे मदतीचे आश्वासन

तुर्कस्तान व सीरियामध्ये भूकंपामुळे झालेले मृत्यू आणि विध्वंस याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल शोकसंवेदना व्यक्त करतो. सीरियाच्या लोकांच्या दु:खात सहभागी असून, या अडचणीच्या काळात त्यांना मदत व पाठिंबा देण्यास बांधील आहोत, असे ते म्हणाले. या दुर्घटनेतून सावरण्यासाठी तुर्कस्तानच्या लोकांना शक्य ती सर्व मदत करण्यास भारत तयार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

ऐतिहासिक किल्ल्याचे नुकसान

भूकंपामुळे गाझियान्तेप शहराच्या मध्यभागी टेकडीवर असलेल्या ऐतिहासिक किल्ल्याचे मोठे नुकसान झाले आहे. किल्ल्याच्या भिंती आणि टेहळणी बुरुजांचे काही भाग भुईसपाट झाले आहेत. तसेच इतर भागांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.

जगभरातून मदतीचा ओघ

या आपत्तीनंतर जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. अनेक देशांनी वैद्यकीय, आर्थिक मदत, शोध-बचाव पथके तुर्कस्तान, सीरियाच्या दिशेने रवाना केली आहेत. युरोपीय महासंघ व ‘नाटो’कडूनही भरीव मदत देण्यात येणार आहे. तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी सांगितले, की देशात सुमारे तीन हजार इमारती कोसळल्या आहेत. भूमध्य सागरीय किनारपट्टीच्या इस्कँडेरॉन शहरात एक रुग्णालय कोसळले, परंतु जीवितहानी त्वरित कळू शकली नसल्याचे उपाध्यक्ष फ्युएट ऑक्टे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहतूक कोंडीने बचावकार्यात अडसर तुर्कस्तानमध्ये, भूकंपग्रस्त प्रदेश सोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यामुळे वाहतूक ठप्प झाली. आपत्कालीन मदत-बचाव पथकांना भूकंपग्रस्त भागात पोहोचण्याच्या प्रयत्नात अडथळा निर्माण झाला. प्रशासनाने रहिवाशांना रस्त्यावर न उतरण्याचे आवाहन केले आहे.