Who Was Saeed Izadi: गेल्या आठवड्यापासून इस्रायल सातत्याने इराणवर हल्ले करत आहे. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत अनेक इराणी कमांडर ठार झाले आहेत. आता इस्रायलने इराणच्या आणखी एका कमांडरला ठार केले आहे. याबाबतची माहिती इस्रायलच्या संरक्षण दलाने दिली आहे.

इस्रायली संरक्षण दलाने त्यांच्या अधिकृत हँडलवर म्हटले आहे की, “इराणच्या इस्रायल नष्ट करण्याच्या योजनेचे प्रमुख सईद इजादी, कोम परिसरात केलेल्या एका हल्ल्यात ठार झाला आहे.”

संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी इजादी यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. दरम्यान, आयडीएफने शुक्रवारी रात्रभर कोममध्ये हल्ले केले आहेत. इस्रायली संरक्षण दलाने इजादी यांना इराणच्या इस्रायल नष्ट करण्याच्या योजनेचे प्रमुख म्हटले आहे, यावरून इजादी इराणसाठी किती महत्त्वाचे होते हे लक्षात येते.

इस्रायली सैन्याच्या म्हणण्यानुसार, इजादी हे कुद्स फोर्सच्या पॅलेस्टिनी कॉर्प्सचे कमांडर होते. ते इराण आणि हमास यांच्यातील मुख्य समन्वयक होते आणि ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवल केलेल्या हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक होते.

दरम्यान हमासने ७ ऑक्टोबर २०२३ मध्ये इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात १,२०० लोक मारले गेले होते. विशेष म्हणजे या हल्ल्यानंतरच गाझामध्ये युद्ध सुरू झाले होते, जे अजूनही सुरू आहे. या युद्धाच आतापर्यंत ५४,००० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

इस्रायली लष्कराने म्हटले आहे की, “तो (इजादी) आयआरजीसी आणि हमास नेत्यांमधील लष्कराचे समन्वयक म्हणून काम करत असे. दहशतवादी कारवायांसाठी हमासला इराणकडून आर्थिक मदत पुरवण्याची जबाबदारीही इजादीकडे होती.”

इजादी यांच्यावर हमासच्या लष्करी शाखेचे पुनरुज्जीवन करण्याचा आणि गाझामध्ये हमासची सत्ता कायम राहावी यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इस्रायली परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यापूर्वी इजादी यांनी हमासला निधी आणि शस्त्रे पुरवली होती. त्यांनी इजादी यांचा मृत्यू इस्रायलच्या गुप्तचर संस्थांचे एक मोठे यश असल्याचे म्हटले आहे.