नव्या पुस्तकातील दावा

नवी दिल्ली : क्रिकेट सामनानिश्चितीसाठी कोणत्याही प्रकारची जबरदस्ती अथवा हत्या करणे गरजेचे नसल्याने ते एका प्रकारचे स्वच्छ काम आहे, केवळ इकडच्या आणि तिकडच्या खेळाडूंशी संधान बांधून पैशांची देवाणघेवाण करावी लागते, असे मत कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याने व्यक्त केल्याचे याबाबत प्रकाशित करण्यात आलेल्या नव्या पुस्तकामध्ये म्हटले आहे.

सामनानिश्चितीच्या खेळामध्ये दाऊद याचा प्रवेश कसा झाला हे सहजपणे या पुस्तकातून स्पष्ट होते. यासाठी कोणाची हत्या करावी लागत नाही, हत्येसाठी सुपारी द्यावी लागत नाही, भूखंड बळकावण्यासारखे प्रकार करावे लागत नाहीत, कोणतीही झोपडपट्टी जबरदस्तीने रिकामी करावी लागत नाही, त्याचप्रमाणे कोणत्या विकासकासाठी कोणत्याही भाडेकरूला धमकी द्यावी लागत नाही, असे या पुस्तकामध्ये म्हटले आहे.

‘नो बॉल : द मर्की वर्ल्ड ऑफ मॅच फिक्सिंग’ या पुस्तकामधून लेखक चंद्रमोहन पुप्पाला यांनी क्रिकेटमधील सर्वात मोठा भ्रष्टाचार मांडला आहे.  डी-कंपनीसाठी मॅच फिक्सिंग हा स्वच्छ व्यवहार आहे. त्यांना केवळ काही खेळाडूंशी संधान बांधावे लागते आणि पैशांची देवाणघेवाण करावयाची आहे, असे लेखकाने म्हटले आहे.

क्रिकेटमधील सट्टेबाजी १९९०च्या दशकामध्ये जगासमोर आली. मात्र भारतामधील पोलिसांना त्याच्या अस्तित्वाची जाणीव होती त्यानुसार काही ठिकाणी छापे टाकून अटकही करण्यात आल्या होत्या, असे ‘पॅन’ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकामध्ये म्हटले आहे.