अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेचे मार्स अ‍ॅटमॉस्फिअर अँड व्होलॅटाईल इव्होल्यूशन म्हणजेच ‘मावेन’ अंतराळयानाने मंगळाच्या कक्षेत यशस्वीरीत्या प्रवेश केला. थंड व कोरडय़ा असलेल्या या ग्रहाचे निरीक्षण यानाने सुरू  केले आहे.
नासाच्या गोडार्ड अवकाश उड्डाण केंद्राचे डेव्ह फोल्टा यांनी सांगितले,की अभिनंदन, मावेन यान मंगळाच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचले आहे.
मावेन हे ऑरबायटर १० महिन्यात ७११ दशलक्ष किलोमीटर अंतर कापून मंगळाच्या कक्षेत पोहोचले असून मंगळाच्या वातावरणाचा अशा प्रकारे प्रथमच अभ्यास केला जात आहे.मावेन यानाकडून मंगळाची माहिती मिळणार आहे. मंगळावर एकेकाळी म्हणजे काही अब्ज वर्षांपूर्वी पाणी व कार्बन डायॉक्साईड होता, त्याचे नेमके काय झाले याची माहितीही या संशोधनातून मिळणार आहे. मंगळाने वातावरण कसे गमावले हे मोठे गूढ आहे, मावेन मोहिमेतून मंगळावर सूक्ष्म सजीवांना पोषक घटक कितपत आहेत याचाही शोध घेतला जाईल. २०३० च्या सुमारास माणूस मंगळावर जाण्याची शक्यता असून त्या वेळी माणसाला तेथे राहण्यासाठी काय करता येईल याची माहितीही या मोहिमेतून उपलब्ध होईल.
मावेन संशोधकांच्या चमूतील जॉन क्लार्क यांनी सांगितले की, मंगळ हा थंड आहे पण तेथे फारसे वातावरण अस्तित्वात नाही. तेथील तापमान शून्याच्या खूप खाली असून तेथे पृथ्वीच्या निम्मेच वातावरण आहे. मंगळ भूतकाळात वेगळा होता व आता वेगळा आहे त्यामुळे त्याच्यात बदल घडू शकतात. मंगळावर प्राचीन काळात पाणी वाहिल्याचे पुरावेही आहेत. आता मावेन यान सहा आठवडय़ांच्या कालावधीत काही चाचण्या करणार असून  तेथील वातावरणाच्या वरच्या भागातील वायूंचा अभ्यास करणार आहे. मंगळ सूर्य व सौरवाताचा सामना कसा करतो किंवा त्याचा काय परिणाम होतो त्याचाही शोध घेतला जाईल. मावेनचा कालावधी १ वर्षांचा असून त्यात ते ३७३० मैलांची परिक्रमा करणार आहे. पाच वेळा हे यान मंगळावर ७८ मैल उंचीवर राहील.