उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका पुढील वर्षी असल्यातरी प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी प्रचारास आत्ताच प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे. विविध सभा, कार्यक्रमाच्या माध्यमातून एकमेकांवर टीकेची राळ उडवण्यात सर्वचे नेते मग्न झाले आहेत. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी भाजपवर टीका केली असून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात असे म्हटले आहे. मुलायम सिंह यादव यांचा बालेकिल्ला असलेल्या आझमगड येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
केंद्र आणि राज्य सरकार आपले अपयश लपवण्यासाठी धार्मिक भावनांना हात घालत आहेत. केंद्र सरकार आपले अपयश लपवण्यासाठी काश्मीर आणि दहशतवादाचा मुद्दा समोर करून पाकिस्तानशी युद्ध छेडू शकतात. लोकांना आता समाजवादी पक्ष व भाजपची रणनिती समजली आहे. निवडणुकीपूर्वी भाजप उत्तर प्रदेशमध्ये हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करून दंगल घडवू शकते. भाजपने तिरंगा यात्रा यासाठीच आयोजित केली होती, असा आरोप मायावती यांनी या वेळी केला.
मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. मोदींनी पूर्वांचल राज्यातील लोकांना दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. मोदींनी मतदारांना ‘विकलेले’ ‘अच्छे दिन’चे स्वप्न आता ‘बुरे दिन’मध्ये बदलले आहेत. जनधन योजना आणि स्मार्ट सिटीसारख्या विकासाच्या योजना या फक्त श्रीमंत लोकांसाठीच केल्या आहेत. खासगीकरणाला वाव देणाऱ्या केंद्र सरकारने दलित आणि ओबीसी आरक्षणाचे फायदे कमी केले आहेत, असे म्हणत बसपाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये सहभागी होणाऱ्या स्वकीयांवरही टीकेची झोड उठवली.
काँग्रेस, सपा आणि बसपा या तिघांना भाजपची लोकप्रियता सहन होत नसल्यामुळे त्या अशाप्रकारची टीका करत असल्याची प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayawati criticize on bjp and samajwadi party
First published on: 29-08-2016 at 10:31 IST